रशिया-युक्रेन युध्दामुळे वीट उद्योग संकटात; स्टीलच्या भाववाढीने बांधकामांना स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 07:19 PM2022-03-11T19:19:15+5:302022-03-11T19:22:06+5:30
Russia Ukrain War: पैठण येथील वीटभट्टीवर पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात
- संजय जाधव
पैठण ( औरंगाबाद ): रशिया आणि युक्रेन (Russia Ukrain War) दरम्यान सुरू असलेल्या युध्दामुळे मोठी उलाढाल असलेल्या पैठण शहरातील वीट उद्योगास फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसात स्टीलचे भाव टनामागे १६ हजाराने वाढले असून सर्वसामान्याचे बांधकाम बजेट यामुळे कोलमडले आहे. सुरू असलेली बांधकामे तूर्त बंद करण्याचा निर्णय सध्या होत असल्याने वीटांची मागणी मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून आले आहे. (Brick industry in crisis due to Russia-Ukraine war) यामुळे वीट उद्योजक मात्र अडचणीत आला आहे.
पैठण तालुक्यात गोदावरीच्या काठावर मोठ्या प्रमाणात वीटभट्टी उद्योग चालतो.पैठणची वीट टिकाऊ असल्याने औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, परभणी पर्यंत जाते. पैठण येथील वीटभट्टीवर पाच हजारा पेक्षा जास्त परप्रांतीय कामगार काम करतात. यावरून शहरातील वीट उद्योगाची व्याप्ती लक्षात येते. दररोज लाखो विटांची विक्री येथून होते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे स्टील महागले असून, त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांना सोसावा लागत असल्याचे समोर येत आहे.दोन्ही देशात युध्द सुरू होण्यापूर्वी ६५ हजार रुपये प्रति टन असलेला स्टीलचा भाव दि ८ मार्च रोजी ८१ हजार रूपये टन झाला होता.
युध्द असेच सुरू राहिले तर स्टीलचे भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यापारी पवन लोहीया यांनी व्यक्त केला आहे. २०२० मध्ये स्टीलचा दर ४२ ते ४५ हजार रुपये टन होता. कोरोनामुळे स्टील उद्योगावर परिणाम झाल्याने दर ६५ हजार रुपयापर्यंत पोहोचला. आता युध्दाच्या परिणामामुळे दर ८१ हजार झाला असून दोन वर्षात ९३% स्टीलचे भाव वाढले आहेत. पंधरा दिवसात १६ हजार रूपये भाववाढ झाल्याने अनेक बांधकाम व्यावसायिकांनी तूर्त बांधकाम थांबवले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विट व बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून बांधकाम मजुरांनाही झळ सोसावी लागत आहे.
विटांचे भाव कडाडणार....
विटा भाजण्यासाठी लागणाऱ्या कोळश्याचे दर दुपटीने वाढले आहेत. पाच ते सात हजार रूपये टनाने मिळणारा कोळसा आता १२ ते १३ हजार रूपये टनाने घ्यावा लागत आहे. यामुळे विटांचे भाव हजार ते पंधराशे रूपया पर्यंत वाढणार असल्याचे पैठण वीट उद्योग असोसिएशनने सांगितले. स्टीलसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने युरोपीय देशातून आयात केला जातो. युध्द सुरू होण्याच्या आधीपासून तिकडून येणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाला आहे. त्याचा फटका स्टील उद्योगाला बसला आहे.
- पवन लोहीया, अध्यक्ष व्यापारी महासंघ, बांधकाम व्यावसायिक, पैठण.
बांधकाम व्यवसाय ठप्प
सध्या स्टीलचे भाव वाढल्याने बांधकाम व्यवसाय हळूहळू ठप्प पडत आहे. यामुळे वीटांची मागणी कमी होत आहे. दुसरीकडे कोळशाच्या भावात दुपटीने वाढ झाल्याने जुन्या भावात वीटा विकणे परवडत नाही.
- पवन शिसोदे, संतोष धापटे, वीट उद्योजक, पैठण.
स्टील दरात तारखेनिहाय झालेली वाढ....
24 फेब्रुवारी 65000 रुपये टन 27 फेब्रुवारी 68000 रुपये टन 1 मार्च 71000 रुपये टन 3 मार्च 74000 रुपये टन 5 मार्च 76000 रुपये टन 6 मार्च 79000 रुपये टन 7 मार्च 80000 रुपये टन