लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धामध्ये तालुक्यातील आम्ला गावाने सहभाग घेतला आहे. या गावात ग्रामस्थांबरोबर वधु-वरासह वऱ्हाडी मंडळींनी रविवारी श्रमदान केले. गावात जलसंधारणाची मोठया प्रमाणात कामे झाले आहेत.तालुक्यात बालाघाटाच्या डोंगरपायथ्याशी दोन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेले आम्ला गाव आहे. गावाने वॉटर कप स्पधेत सहभाग घेतल्यानंतर ८ एप्रिलपासून श्रमदानाच्या कामाला झपाटून सुरुवात केली आहे. सकाळी सहा ते दहा वाजण्याच्या दरम्यान महिला पुरूष श्रमदानाचे काम करीत आहेत. मागील महिनाभरात श्रमदानातून डोंगर उताराला समतल चर, वृक्ष लगवडीसाठी खड्डे, माती बांध, बांध बंदिस्ती कामे श्रमदानातून करण्यात आले आहेत. डोंगर उतारावर खोलचर, नाला खोलीकरण आदी कामे यंत्राच्या सहाय्याने करण्यात आले आहेत.७ एप्रिल रोजी गावातील गंगाधर पांचाळ यांच्या मंदा या मुलीचे लग्न काळेवाडी येथील आशोक पांचाळ यांच्याबरोबर ठरले. लग्नाला तीन तासांचा अवधी होता. गावातील मोठया प्रमाणात महिला-पुरूष श्रमदानासाठी गेले होते. आपणही गावात काय करावे म्हणून वधु-वराने २० ते २५ वऱ्हाडी मंडळीसोबत घेवून ९ वाजता एकतास बांध बंदिस्तीच्या कामासाठी श्रमदान केले. एक तास श्रमदान केल्याने तर सर्व गावकऱ्यांसह वधू-वर १० वाजता गावात पोहचले. वधु-वरासह वऱ्हाडी मंडळीने श्रमदान केल्याने लग्नानंतर गावात चर्चेचा विषय सुरू होता.आम्ला ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजले आहे. श्रमदानाच्या कामासाठी सर्व हजर राहतात. गावातील पांचाळ कुटूंबाच्या घरी लग्न होते तर वधू-वरासह वऱ्हाडींनी श्रमदान केले. गाव पाणीदार करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून, यश मिळवणार असल्याचा आशावाद पं. स. सभापती आशालता सोळंके यांनी सांगितले.
वधूवरासह वऱ्हाडी मंडळी थेट श्रमदानाला
By admin | Published: May 11, 2017 11:29 PM