खुलताबाद ( औरंगाबाद ) : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच तेही अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचणे, कठडे वाहून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे, आदी प्रकार होत आहेत. तसेच वेरूळ आणि कन्नड नजीकचा पूल देखील खचला आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या महार्गावरील वेरूळ आणि कन्नड जवळील पूल, बायपास जवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यातून मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच औरंगाबाद ते कन्नड दरम्यान मार्गावरील विविध फलक सदोष असून ते बदलावेत, अशी मागणी हाेत आहे.
दोन वर्षांपूर्वीच सदरील महामार्गाचे काम झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महामार्गाला तडे पडणे, पुलास भगदाड पडणे आदी प्रकार पुढे आले आहेत. यामुळे वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याची दखल राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेण्याची मागणी होत आहे.