हिंगोली : जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच प्रत्येकी दोन मोफत गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र सदर योजना जिल्ह्यात बारगळल्याचे चित्र आहे. शिवाय एकाही तालुक्याने याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे अहवाल सादर केला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी अनेक मुलांना जुन्याच गणवेशावर शाळेत हजर रहावे लागले.सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट होते. मात्र संबंधित गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कमच जमा झाली नाही. त्यात अनेक विद्यार्थ्यांचे अद्यापही खाते उघडण्यात आली नाहीत. या ताळमेळात मात्र अजान बालकांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय मोजक्याच विद्यार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरल्याची नोंद सर्व शिक्षाकडे उपलब्ध आहे. संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना गणवेश योजनेतील लाभार्थ्यांची माहिती गुगल फॉर्मवर भरून देण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिल्या होत्या. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ७४ हजारांपैकी केवळ २ हजार ५१८ विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्यात आली आहे. एखाद्या शासकीय योजनेची अंमलबजावणी होत नसल्यास वरिष्ठ लक्ष घालतात. परंतु गणवेशाबाबत मात्र असे होताना दिसून येत नाही.
गणवेश योजनेचा सावळा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:15 AM