लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन/ वालसांवगी: भोकरदन तालुक्यातील वालसांवगी येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. सचिन फुसे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ८५३ रँकने उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा निकाल जाहीर होताच वालसांवगी या गावात आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.वालसांवगी येथील शेतकरी सुखलाल फुसे व लिलाबाई फुसे या दाम्पत्यास चार मुले आहेत. डॉ सचिंन फुसे त्यांचा सर्वात लहान मुलगा. सचिन यांच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तिघांचे शिक्षण जेमतेम वाचता येईल एवढेच. वडील चौथी उत्तीर्ण तर आई निरक्षर. अशा स्थितीतही या कुटुंबाने सचिनला चांगले शिक्षण दिले. सचिन यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वालसावंगीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण लातूरच्या दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पूर्ण केले. एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून वैद्यकीय अभ्यासक्रमही पूर्ण केला. मात्र, प्रशासकीय सेवेकडे कल असल्यामुळे डॉ. सचिन यांनी दिल्लीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठीही तयारी सुरू केली. यशाने त्यांना दोन वेळा हुलकावणी दिली. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा परीक्षा दिली आणि बुधवारी याचा निकाल जाहीर झाला. डॉ. सचिन यांनी ८५३ ची रँक घेऊन ही परीक्षा उत्तीर्ण केली. डॉ. सचिन यांनी युपीएससीच्या परिक्षेत यश संपादन केल्याची महिती गावात कळताच ग्रामस्थांनी फुसे यांच्याघरासमोर येऊन आतषबाजी केली. त्यांच्या वडीलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. सचिन यांच्या यशाने गावासह जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मिळविले उज्ज्वल यश
By admin | Published: June 02, 2017 12:36 AM