छत्रपती संभाजीनगर : सकाळी दरवाजा उघडा दिसताच घरातील आतल्या खोलीपर्यंत घुसून चोराने मोबाइल लंपास केला. मोबाइलधारकाने तत्काळ गेलेल्या मोबाइलचे गुगल लोकेशन ट्रॅक केले व पुढे अवघ्या एका तासात चोराच्या घरासमोर हजर झाला. तोपर्यंत पोलिसांनी देखील धाव घेतली होती. त्याने चोरलेला मोबाइल, पाकीट जप्त करून पोलिसांनी त्याला अटक केली. सय्यद हनीफ उर्फ बा हबीब (२९, रा. किराडपुरा) असे त्याचे नाव आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी रमेश ईधाटे (रा. सुदर्शन नगर) यांच्या पत्नी सोमवारी सकाळी ७:३० वाजता अंगण झाडत होत्या. घरामागील परिसर झाडण्यासाठी त्या जाताच समोरील उघड्या दरवाजातून चोर घरात घुसला. काही मिनिटांमध्ये त्याने ड्राॅवर तपासून आतील खोलीपर्यंत जात पाकीट व मोबाइल
पळवला. काही वेळाने ईधाटे यांना जाग आल्यानंतर त्यांना मोबाइल दिसला नाही. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर चोरीची घटना निदर्शनास आली. चोराला नेमका मोबाइल बंद करता आला नाही. त्यामुळे ईधाटे यांनी ई-मेलद्वारे ट्रॅक माय डिव्हाईस या प्रणालीद्वारे शोध घेतला. त्यात मोबाइल किराडपुऱ्यात असल्याचे स्पष्ट झाले.
ईधाटे यांनी सिडको पोलिसांना ही बाब कळवून स्वत: किराडपुऱ्यात लोकेशननुसार दाखल होत थेट चोराच्या घरासमोरच उभे राहिले. हे पाहून चोरही हबकला. त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत सिडकोचे सहायक फौजदार सुभाष शेवाळे यांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. हनीफवर दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्तांनी त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपार केले असताना तो शहरात फिरत होता.