छत्रपती संभाजीनगर : चार-पाच महिन्यांपासून थकलेल्या खोली भाड्याचे पैसे देण्यासाठी समोरच्या घरात कोणी नसल्याचे पाहुन घर फोडल्याची घटना २४ सप्टेंबरच्या रात्री घडली होती. या घटनेत गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना बेड्या ठोकत त्यांनी चोरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्त केला आहे. त्यातील एक आरोपी हा पाच वर्षांपासून दुचाकीच्या चोरीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे स्पष्ट झाले.
दीपक भागचंद चव्हाण (रा. भिवधानोरा, ता. गंगापूर, सध्या रा. बकवालनगर) आणि सागर अशोक जाधव (रा. पाखोरा, ता. गंगापूर) अशी पकडलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपीतील दीपक चव्हाण हा भाड्याची खोली घेऊन बकवालनगरात राहतो. त्याचे मागील काही महिन्यांपासूनचे भाड्याचे पैसे थकले आहेत. त्यामुळे घर मालकाने त्यास १ ऑक्टोंबरची मुदत दिली होती. या पैशासाठी दीपक चव्हाण याने त्याचा खास मित्र सागर जाधव यास बोलावून घेतले. दीपकच्या घरासमोरच राहणारे मंचक देवकते हे घरी नव्हते.
त्याचा फायदा घेत आरोपींपी पाठीमागील मोकळ्या जागेतुन घरात प्रवेश केला. घरातील सर्व सामानाची नासधुस केली. मात्र, त्यांना फक्त २२ रुपये रोख मिळाले. त्याशिवाय आरोपींनी दागिन्यांचाही शोध घेतला. मात्र, काही सापडले नाहीत. शेवटी आरोपींनी काहीच मिळत नाही म्हटल्यानंतर लॅपटॉप, एलईडीसह इतर ५६ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. या घटनेचा समांतर तपास गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे यांचे पथक करीत होत. या पथकास एक आरोपी लॅपटॉप विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक बोडखे यांच्या पथकाने आरोपी सागर याच्या पाखोरा गावीही भेट दिली. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर सीडीआरच्या माध्यमातुन आरोपींचे लोकेशन समजल्यानंतर दोघांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरून नेलेले सर्व मुद्देमालही हस्तगत केला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विशाल बोडखे, सहायक फौजदार सतीष जाधव, संदीप तायडे, संजय राजपूत, राहुल खरात, संदीप राशिनकर, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.खोली भाड्याचे पैसे देण्यासाठी शेजाऱ्याचे फोडले घरगुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या : चोरीच्या गुन्ह्यात घेत होते पोलिस शोध