कन्नड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी खोक्यांच्या चर्चेला तोंड फोडणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या ताब्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याच्या इराद्यानेच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची मराठवाड्यातील सुरुवात कन्नड येथून शुक्रवारी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. त्यानंतर गोवा मार्गे भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपद मिळविले. या घटनेला आता जवळपास ११ महिने झाले तरी त्यावेळी साथ न देणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांचा हिशेब चुकता करण्याचा चंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्वप्रथम खोक्यांच्या चर्चेला कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी तोंड फोडले. त्यानंतरच राज्यभर खोक्यांची चर्चा सुरू झाली. याची सल मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबत गेलेल्या जिल्ह्यातील ५ आमदारांना असल्याचे समजते. त्यामुळेच आमदार राजपूत यांच्या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे निमित्त साधून कन्नड येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा हा खटाटोप असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आ. राजपूत हे कन्नड मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे जनतेला सांगून आपणच सत्तेच्या माध्यमातून या भागातील जनतेचे कसे कैवारी आहोत, हे दाखविण्याचा या कार्यक्रमामागचा हेतू आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक माजी आमदार नितीन पाटील यांना या माध्यमातून आ. राजपूत यांच्या पदाचे दावेदार म्हणून पुढे केले जाऊ शकते. कारण जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांपैकी ३ मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात असून शिवसेनेच्या ताब्यातील ६ पैकी कन्नड वगळता अन्य ५ विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा-शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व असावे, या हेतूने कन्नडचा किल्ला सर करण्यासाठी भाजपाचीही मदत मुख्यमंत्र्यांकडून घेतली जात असल्याचे समजते. त्यामुळेच तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील शुक्रवारच्या कार्यक्रमास येत आहेत.
कन्नडसाठी मुबलक निधीची घोषणा होणारपालकमंत्री संदीपान भूमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे मतदारसंघ सोडून तसेच शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर जोरकसपणे मांडणारे आमदार संजय सिरसाठ, पहिल्या दमात शिंदे गटास सहभागी असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात १९८८ पासून सक्रिय असलेले आमदार प्रदीप जयस्वाल यांचे मतदार संघ सोडून कन्नडवर ताबा मिळविण्यासाठी शुक्रवारच्या कार्यक्रमात या मतदारसंघासाठी मुबलक निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे.