छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट प्लेसमधील गुंडगिरी, स्पोर्ट्स बाइकचालकांची कर्कश आवाजातील स्टंटबाजी, रस्त्यावर साजरे होणारे वाढदिवस, बेशिस्त पार्किंगने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण केले आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक शौचालयातून बाहेर पडलेल्या एका व्यावसायिकाला एका नशेखोराने विनाकारण कानशिलात लगावून आपल्या गुंडगिरीचे प्रदर्शन केले. गुरुवारी कॅनॉट प्लेसमध्ये शहराच्या दोन्ही उपायुक्तांनी भेट दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी ही घटना सांगत भीषण परिस्थिती विशद केली.
नवनियुक्त उपायुक्त नवनीत काँवत, परिमंडळ-१ चे उपायुक्त नितीन बगाटे यांनी शहराच्या वर्दळ असलेल्या भागांचा गुरुवारी आढावा घेतला. सायंकाळी ७ वाजता त्यांनी सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह कॅनॉट प्लेसला भेट दिली. गेल्या दोन दिवसांपासून सिडको पोलिसांनी घेतलेल्या ठोस भूमिकेचे व्यापाऱ्यांनी कौतुक केले. मात्र, तरीही अपेक्षित परिणाम होत नसल्याची खंतही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी एक खाद्यपदार्थ व्यावसायिक रात्री ८:४५ वाजता सार्वजनिक शौचालयात गेले होते. तेथून बाहेर पडताना एकाने अचानक मागून त्यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारला. यामुळे त्यांच्या कानाला इजा होऊन भोवळ आली.
कारवाईत अडथळा, तिघांवर कारवाईगुरुवारी टवाळखोरांना हुसकावून लावत असताना तिघांनी पोलिसांना कारवाईस विरोध करून प्रश्न विचारणे सुरू केले. त्यावर व्यापाऱ्यांनी पोलिसांची बाजू घेत कारवाईस विरोध न करण्याची विनंती केली. मात्र, तरीही विरोध थांबला नाही. परिणामी, व्यापारी व तिघांत चांगलीच बाचाबाची होऊन मोठी गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत ठाण्यात नेत प्रतिबंधात्मक कारवाई केली.
आक्षेपार्ह चाळे, गुंडगिरीला ऊत; पण...एकेकाळी शहराच्या आकर्षणाचे केंद्र राहिलेल्या कॅनॉट प्लेसमध्ये सर्वसामान्यांपेक्षा गुंडांचा वावर वाढत गेला. अवैध टपऱ्यांची वाढलेली संख्या, त्यावर सर्रास मिळणारे नशिले पदार्थ, चहाच्या हॉटेलमध्ये सर्रास वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांनी वातावरण दूषित केले. अनेक तरुण, तरुणी रात्री ८ वाजेनंतर आक्षेपार्ह चाळे करतात. सुसाट, कर्कश आवाजात वाहने दामटवली जातात, बेशिस्तपणे रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. पोलिसांच्या कारवायांत सातत्य राहत नसल्याने या गावगुंडांवर परिणाम होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.