उंडणगाव : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे जोरात असून प्रचार थंडावला आहे. उमेदवारांनी निवडून येण्यासाठी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे वॉर्डातील प्रत्येक घर पिंजून काढून आश्वासनांची खैरात वाटली. त्यांचे हे दररोजचे आश्वासनांचे तुणतुणे पाहून मतदारही हुशार झाल्याचे दिसून आले. तेही आता ‘भाऊ, तुम्ही अजिबात चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्याच पाठीमागे आहोत’ असे आश्वासन देत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून आले.
सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धूम सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच उमेदवारांनी प्रचार सुरू केला होता. जसजशी निवडणूक जवळ येत गेली, तसतशी प्रचारात मोठी रंगत चढत गेल्याचे दिसत आहे. बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यापूर्वी दररोज उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करीत होते. सकाळी सकाळीच टपकलेल्या उमेदवारांना मतदारही आता, भाऊ, चिंता करू नका. आमचे मतदान तुम्हालाच, म्हणून वाटी लावताना दिसत होते. घरी येणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी हे वाक्य उच्चारले जात असल्यामुळे मतदान नक्की कोणाला करणार, हे १५ तारखेनंतरच स्पष्ट होणार आहे.
चौकट
निवडून येण्यासाठी विविध क्लुप्त्या
विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकींपेक्षाही ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची असते. यात गावाच्या पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. त्यामुळे निवडून येण्यासाठी सगळेच हातखंडे वापरले जातात. कोणी खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, भावकीसह नात्यागोत्यांचीही यावेळी चांगलीच कसोटी लागलेली असते.