पैठण : येथील रूग्णालयातील परिचारक ( ब्रदर ) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आज दुपार नंतर पैठण शहरात खळबळ उडाली. सदर ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह आल्याचा दुरध्वनी संदेश असून अद्याप त्याचा लेखी अहवाल आलेला नाही, परंतु प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना राबविण्यास प्रारंभ केला आहे, असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले.
औरंगाबाद शासकीय रुग्णालयाचे (घाटी) पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र नावाने रूग्णालय आहे. या रूग्णालयात कार्यरत असलेल्या ब्रदरची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली असल्याचे रूग्णालयाच्या प्रपाठक डॉ सीमा माळी यांनी सांगितले. दरम्यान या ब्रदरवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचेही डॉ सीमा माळी यांनी सांगितले. रूग्णालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने रूग्णालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ब्रदरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय रुग्णालय व तालुका प्रशासनाने तातडीने ब्रदरच्या प्रथम संपर्कात आलेल्या रूग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असून जवळपास ३५ जण ब्रदरच्या प्रथम संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना क्वारंटाईन करून अलगीकरण कक्षात हलविण्यात येणार आहे. जायकवाडी येथील महसूल प्रबोधिनीच्या ईमारती मधील आयसोलेशन कक्षात या सर्वांना ठेवण्यात येणार आहे. या सर्वांचे स्वँब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांचे अहवाल काय येतात यावर ब्रदरच्या सेकंड लाईन संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे असे पैठण घाटीच्या प्रपाठक डॉ सीमा माळी यांनी सांगितले.
ब्रदरने दि १६ रोजी सोडले पैठणमुळ औरंगाबाद येथील रहिवाशी असलेल्या ब्रदरने दि १५ रोजी ड्युटी केल्यानंतर दि १६ रोजी पैठण सोडले होते. औरंगाबाद येथे गेल्यानंतर ब्रदरला त्रास जाणवत असल्याने त्याला कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आज त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली.
नाथ मंदिर परिसरातील भक्त निवासमध्ये रहात होताप्रशासनाने औरंगाबाद शहरातून अपडाऊन करण्यास मनाई केल्यानंतर पैठण घाटीतील प्रपाठकासह डॉक्टर, परिचारक शहरातील नाथ मंदिराच्या भक्त निवासात मुक्कामी होते. पॉझिटिव्ह आलेला ब्रदर सुध्दा याच भक्त निवास मध्ये रहात होता. दरम्यान या ब्रदरचा पैठण शहरातील नागरिकांशी फारसा संबंध आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी घाबरू नयेपैठण रूग्णालयात सुरक्षिततेचे सर्व निकष पाळून कामकाज केले जात आहे. सदर ब्रदर सोबत आम्ही ड्युटी केलेली आहे, असे असतानाही आम्हाला कुठलाच धोका वाटत नाही, नागरिकांनी घाबरू नये काळजी घ्यावी असे आवाहन घाटीच्या प्रपाठक डॉ सीमा माळी यांनी केले आहे. याच प्रमाणे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके, तालुका आरोग्य अधिकारी विजय वाघ, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी केले आहे.