गंगापूर : अतिपावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात वाटोळे झाले होते. जिकडे तिकडे शेतशिवारात झालेले नुकसान पाहून काळीज पिळवटून निघत असताना त्यातूनही सावरून शेतकऱ्यांनी पुन्हा रबीत नवी उभारी घेतली. खरीप पिकांचे नुकसान पाहणीकरिता केंद्रीय पथक येणे अपेक्षित होते. मात्र, तेव्हा ते आले नाही. आता रबीची पिके बहरली असताना, सोमवारी त्यांनी खरीप नुकसानीची पाहणी केली. गावच्या कट्ट्यांवर मात्र, ही बाब हस्यास्पद पद्धतीने घेतली जात असून, एकतर केंद्रीय पथकाकडे अद्भूत चष्मा किंवा तिसरे नेत्र असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.
राज्यात अतिपावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जवळपास पिकांचे मात्रे होऊन शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र त्यावेळी सगळीकडे दिसत होते. यावेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाने संवेदनशीलता दाखवून पाहणीकरिता पथक पाठविणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. आता वरातीमागून घोडे या म्हणीप्रमाणे पथक जिल्ह्यात दाखल झाले असून खरिपाचे नुकसान ते बहरलेल्या रबीत मोजत आहे. या पथकाने सोमवारी गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, वरखेड, नरहरी रांजणगाव, जाखमाथा येथील पीक पाहणी केली. यात खरीप हंगामातील मका, कापूस तर रबीमधील ज्वारी, बाजरी पिकांची पाहणी केली. दुपारपर्यंत पाहणी करून थकलेल्या पथकाने दुपारी २ वाजता गंगापूर - औरंगाबाद मार्गावरील हॉटेलमध्ये भोजन केले. दरम्यान, शेतकरी नेते संतोष जाधव व त्यांचे साथीदार हे केंद्रीय पथकाला भेटण्यासाठी जात असताना शिल्लेगाव पोलिसांनी त्यांना अटक करून ठाण्यात बसविले होते.
चौकट
जखम बोटाला आणि मलम पोटाला
सध्याचा केंद्रीय पथकाचा खरिपातील पीक पाहणी दौरा हा ‘जखम बोटाला आणि मलम पोटाला’ या पद्धतीने पाहिला जात आहे. खरिपातील नुकसानीचा आता मागमुसही शिल्लक नसताना ते काय पाहणी करीत असावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक यावेळी व्यक्त करीत होते.