योगेश पायघन
औरंगाबाद : भाऊ, रिपोर्ट घ्यायला हीच रांग का? तपासणीची रांग कोणती? असा प्रश्न बन्सीलालनगर येथील अग्निशमन केंद्रासमोर उभे राहिल्यावर साहजिकच विचारला जातो. तपासणीसाठी स्वॅब द्यायला आणि २४ ते ४८ तासांनी आलेला अहवाल लिहून घेण्यासाठी इथे तासन् तास रांगा लागत आहेत.
कमी मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर ताण, त्याची चीडचीड तिथे येणाऱ्यांना साहजिकच जाणवते. कोणी त्यांच्याप्रति सहानभूती दाखवते तर कुणी हक्कांची जाणीव करून देतात. त्यातून होणारी हुज्जत, हमरीतुमरी, त्यात अहवाल वेळेत न मिळाल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागत असून, त्यांच्या रोषाला मात्र, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले.
महापालिकेकडून बन्सीलालनगर येथील अग्निशमन केंद्र येथे गुरुवारी सकाळी साडेबारा वाजता लोकमत प्रतिनिधीने भेट दिली. त्यावेळी अग्निशमन केंद्राच्या गेटपर्यंत रांगा लागलेल्या होत्या. एका रांगेत तपासणीसाठी कुटुंब आणि कंपन्यांतील जत्थेच्या जत्थे येत होते. त्यात सुरक्षित अंतर नाही. एकमेकांशी मनसोक्त गप्पा, तर दुसरीकडे बुधवारी आणि गुरुवारी दिलेल्या स्वॅबचे अहवाल घेण्यासाठी आलेले नागरिक, इथे पाॅझिटिव्ह लोकही रिपोर्ट घ्यायला येत आहेत, म्हणून चिंता व्यक्त करत होते.
येथील परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, २४ तास तीन शिफ्टमध्ये केंद्र सुरू आहे. ४०० हून अधिक जणांचे स्वॅब घेतले जात आहेत. त्यासाठी एका शिफ्टला एकच टीम असल्याने तंत्रज्ञच ऑनलाईन नोंद घेऊन स्वॅब घेत आहे, तर डाॅक्टरला नोंदणीस आलेल्या अहवालाची खतावणी करून त्याचे अहवाल लिहून नागरिकांना द्यावे लागत आहेत. येणारे लोक आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरेसे नसल्याने नागरिकांनाही जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच कर्मचाऱ्यांनाही कामाचा ताण होत असून मनुष्यबळ वाढवून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
किलेअर्क येथील केंद्रावर डाॅ. उत्कर्षा कारमोटे म्हणाल्या, तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एका टीमकडून हे काम शक्य नाही. मदतीला आणखी एक टीम देण्याची गरज आहे. सकाळ आणि सायंकाळच्या शिफ्टमध्ये दीडशेच्या जवळपास स्वॅब घेतले जातात, तर रात्रीच्या शिफ्टमध्ये ६० ते ७० टेस्ट केल्या जातात. तेवढ्याच लोकांना रिपोर्ट लिहून द्यावे लागतात. आयसीएमआर ऑनलाईन नोंदणी, अहवाल शोधणे, लिहिणे यासाठी मदतीला ऑपरेटर असल्यास काम लवकर होईल. नागरिकांना सुविधा होईल. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून हातमोजे मागूनही मिळत नाहीत. टीमला पूर्वी जेवणाची सुविधा होती. ती आता मिळत नाही. तीही पूर्ववत होणे गरजेचे आहे. या केंद्रावर मात्र, तपासणीसाठी आलेल्यांची संख्या तुरळक होती.
-----
केंद्रावर तपासणीसाठी, अहवाल घेण्यासाठी आलेले म्हणाले.....
नोंदणी ऑनलाईन करण्यात खूप वेळ गेला. मात्र, एसएमएस आलाच नाही. इथे लोक रांगा अंतर ठेवून लावत नाहीत. नोंदणी प्रतीची काॅपी घेऊन यायला सांगतात. या नियोजनात सुधारणा करून नागरिकांना केंद्रावर जास्त वेळ थांबावे लागू नये, अहवालासाठी चकरा माराव्या लागू नयेत यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
- रवींद्र देशमुख, उल्कानगरी
---
बुधवारी मी तपासणी केली. गुरुवारी आईची तपासणी केली. त्याचा अहवाल घेण्यासाठी आले. पाॅझिटिव्ह रुग्णही इथे येत आहेत. अहवाल कधी मिळेल त्याला काही वेळेची मर्यादा नाही. चकरा माराव्या लागत आहेत. तपासणीच्या फेऱ्यात मी पाॅझिटिव्ह होऊ नये, याचीच चिंता आहे.
- तेजस पाटील, बन्सीलालनगर
--
बुधवारी स्वॅब दिला. अद्याप अहवाल आला नाही. एसएमएस पण मिळाला नाही. आईला बाधा झाली आहे. त्याचाही फोन आला नाही. इथे अहवाल घेतल्यावर ते कळाले. असे इतर पाॅझिटिव्ह रुग्णही रिपोर्ट घ्यायला स्वतः येत आहेत. याचे महापालिकेने योग्य नियोजन करायला हवे. इथे संक्रमण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- हरिका मामेरीपाठी, उस्मानपुरा
----
हे केंद्र कामगार, व्यापाऱ्यांसाठी नाही;
त्यांच्यासाठी चार वेगळी केंद्रे लवकरच
कामगार, व्यापाऱ्यांनी सध्या असलेल्या तपासणी केंद्रांवर जाऊ नये. तिथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. सध्याचे तपासणी केंद्र हे आजारी रुग्ण व त्यांच्या संपर्कातील रुग्णांसाठी आहे. व्यापारी आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र चार केंद्रे लवकरच सुरू होतील. तिथेच त्यांनी तपासणी करावी. तपासणी अहवालही मोबाईलवर पाठविण्याची व्यवस्था पुढील दोन दिवसांत सुरळीत होईल. तपासणी केंद्रावर टीम वाढविण्यात येतील.
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, औरंगाबाद