बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘राधे: योर मोस्ट वाॅन्टेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’ हे गाणे खूप चर्चेत असून, सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइल, हॉट अभिनेत्री दिशा पटानी, जानी मास्टरची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’ हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरायला लावत आहे. या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून, शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी कंपोज केले आहे. ज्यांनी या आधी सलमानसाठी सेन्सेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.
शिऱ्याचे पडद्याआड राहून कोरोनाविरोधात कार्य
एक मराठी कलाकार आहे जो कोणताही गाजावाजा न करता कोरोना पीडितांची अविरत सेवा करतोय. कदाचित त्याने केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचलीही नसेल. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून त्याचे हे कार्य अविरत सुरू आहे. तो कलाकार आहे, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेत शिऱ्याची भूमिका साकारणारा अभिनेता विकास कदम. विकासने एका मित्राच्या मदतीने मुंबईतल्या बीकेसीमध्ये कोविड टेस्टिंग लॅब उपलब्ध करून दिली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ही लॅब २४ तास सुरू असते. हे काम करत असताना खुद्द विकासलाही दोनवेळा कोरोनाची लागण झाली; मात्र तो तिथेच थांबला नाही. कोरोनावर मात करत ठणठणीत बराही झाला. कोरोनाची लागण झाली तेव्हा देखील त्याचे कार्य सुरू होते.
प्रवीण तरडेंना अश्रू अनावर
मनोरंजन विश्वानेही कोरोनामुळे अनेक कलाकार गमावले आहेत. अभिनेते अमोल धावडे यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे हे तर मित्राच्या मृत्यूमुळे कोलमडून गेले आहेत. तरडे यांनी एक भावुक करणारी पोस्ट लिहिली, ‘माझा मित्र अमोल धावडे गेला. कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसांत खाल्ला. किती आठवणी ..? १९९६ साली मी लिहिलेल्या ‘आणखी एक पुणेकर’ या एकांकिकेत पहिला डायलॉग याने म्हटला होता म्हणून, माझ्या प्रत्येक सिनेमात एकतरी सीन अमोलसाठी लिहायचोच..'