छत्रपती संभाजीनगर : तेलंगणापुरता सीमित असलेला भारत राष्ट्र समिती हा पक्ष आता महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसलाच आव्हान ठरू पाहत आहे. त्यातच येत्या २४ मे रोजी आमखास मैदानावर चंद्रशेखर राव यांची होणारी जाहीर सभा आता औत्सुक्याचा विषय ठरली आहे. या सभेत कोणत्या पक्षाचे कोण कोण ‘बीआरएस’मध्ये जाणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
तेलंगणा नांदेडलगत असल्यामुळे तिकडे ‘बीआरएस’ हातपाय पसरवत असेल, असे आधी सगळ्यांना वाटले. शंकरराव धोंगडे यांच्यासारखा जाणकार नेता राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ‘बीआरएस’मध्ये गेला तेव्हाच भुवया उंचावल्या गेल्या होत्या; पण प्रवेश केलेल्यांची नावे डोळ्यासमोर आणली तर ती राष्ट्रवादी काँग्रेसचीच अधिक असल्याचे दिसून येते. वैजापूरचे अभय पाटील चिकटगावकर, कन्नडचे हर्षवर्धन जाधव, छत्रपती संभाजीनगरचे कदीर मौलाना, शिक्षक मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार हभप प्रदीप सोळुंके ही सारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि तीही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली. आधीच छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी कमजोर आहे. आ. सतीश चव्हाण व विक्रम काळे हे दोन मराठवाडाभर मतदारसंघ असलेले आमदार सोडले तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती तोळामासाचीच आहे.
जिल्ह्यात निवडून आलेला एकही आमदार नाही. मागच्या वेळी महापालिकेत बोटावर मोजता येतील, इतकेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. जिल्हा परिषदेतही फारशी चांगली स्थिती नव्हती. आता तर ‘बीआरएस’च्या आगमनाने राष्ट्रवादी काँग्रेससमोर चिंतेचेच वातावरण दिसते. पूर्वीपासूनच पक्षात सीनियर-ज्युनियर असे गट आहेत. जिल्हाभर पक्ष संघटना बांधण्यासाठी भरीव प्रयत्नही होताना दिसत नाहीत. त्यात पुन्हा नाराज मंडळी ‘बीआरएस’च्या वाटेवर असल्याने पक्षाच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले पाहिजे व वेळीच पक्षात फेरबदल करून गळती थांबविली पाहिजे, अशी चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने पक्षातील सीनियर मंडळींचा गट सक्रिय झाला असल्याचे समजते. दरम्यान, २४ एप्रिलच्या चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेत अनेकांचा प्रवेश होत असल्याचे समजते.