गंगापूर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल शुक्रवारी (दि. १९) जाहीर करण्यात आला. यात अंबेलोहळ येथील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्षाचा एक उमेदवार विजयी झाल्याने पक्षाने राज्याच्या राजकारणात विजयी प्रवेश केला आहे.
विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. यातील गवळीधानोरा, भोयागाव, मलकापूर येथील प्रत्येकी एका जागेसाठीची सदस्यपद निवड बिनविरोध झाली होती. तर वरझडी व नवाबपूर येथे एक देखील अर्ज न आल्याने येथील जागा रिक्त राहणार आहे. तर उर्वरित अंबेलोहळ, जिकठान, मांगेगाव या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी गुरुवारी ७५ टक्के मतदान झाले होते.
यात जिकठान येथून अहेमदखा पठाण हे तर मांगेगाव येथून रुपाली रोडगे व अंबेलोहळ येथून सरदार गफ्फार पठाण हे तीन उमेदवार विजयी झाले. आंबेलोहळ येथील गफ्फार पठाण हे बीआरएस पक्षाचे पदाधिकारी आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने विजय मिळविला असून पठाण यांच्या विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांनी जल्लोष केला.
महिनाभरात बीआरएस ४५ हजार गावांत जाणारदरम्यान, आगामी काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील ४५ हजार गावे आणि ५ हजार नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात बीआरएसचे कार्यकर्ते २२ मे ते२२ जून असे महिनाभर घरोघरी फिरतील. प्रत्येक दिवशी किमान पाच गावात जातील. प्रत्येक गावात ते वेगवेगळ्या घटकातील ९ समित्या स्थापन करतील. पुढील महिनाभरात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात बीआरएस पक्षाचे नाव आणि झेंडा पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, आपले म्हणणे लोकापर्यंत पोहचवा असे आवाहन बीआरएसचे सर्वेसर्वा आणि तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज नांदेड येथील मेळाव्यात केले.