औरंगाबाद : ऑक्टोबर २०१९ मध्ये देशभर मोठा गाजावाजा करत जाहीर केलेले बीएसएनएल रिव्हायवल पॅकेज म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. याअंतर्गत दिलेली कोणतीही आश्वासने शासनाने पुर्ण केलेली नाहीत. या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून बीएसएनएलला फोर जी देण्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जनतेचे, सरकरचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १ ऑक्टोबर हा बीएसएनएलचा वर्धापन दिन सर्व बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी काळा दिवस म्हणून पाळला.
शहरातील सिडको येथील संचार सदन येथे सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून सरकारच्या बीएसएनएल विरोधी नितीचा निषेध केला. दुपारच्या सुटीत निदर्शने केली. तसेच बीएसएनएल फोर जी सेवा त्वरीत सुरू करावी, बीएसएनएलच्या रिव्हायवल पॅकेजची अंमलबजावणी करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करावे, या मागणीसाठी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी रंजन दाणी, जॉन वर्गीस, ए. आर. वाघमारे, गुलाब काळे, शिवाजी चव्हाण, पी. पी. पाटील, बी. एम. सानप, अजय मोहिते, दत्ता दुबिले यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.