गेल्या वर्षभरापासून बीएसएनएलची मोबाइल सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराने त्रस्त मोबाइल ग्राहक वारंवार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने वैतागले आहेत. कायगावसह शेजारच्या जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब आदी ११ गावांसाठी आणि औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील ढोरेगाव ते जुने कायगावपर्यंतच्या १० कि.मी. अंतरासाठी कायगावात बीएसएनएल टॉवर बसविण्यात आलेले आहे. बीएसएनएलचे दुर्लक्ष होत असल्याने मोबाइल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मोबाइल शोभेची वस्तू बनले आहेत. तर इंटरनेट सेवाही ठप्प झाल्याने मोबाइलधारक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोबाइलच्या वायर तुटण्याचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. वायर तुटल्यानंतर त्या पूर्ववत जोडण्याच्या कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे आणि स्थानिक ग्राहक असे हजारो बीएसएनएल मोबाइलधारक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहेत. नेटवर्क बंद असल्याने इंटरनेट आणि कॉलिंग या दोन्ही सुविधांचा ग्राहकांना फटका बसत आहे.
राष्ट्रीय मार्गावरील बीएसएनएलची सेवा पंधरा दिवसांपासून विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:06 AM