छत्रपती संभाजीनगर : बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली बुद्धभूमी उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचणारांचा छडा लावा, बौद्ध सर्किटमध्ये या श्रद्धास्थळाचा समावेश करून शासनाने तेथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, या व इतर मागण्यांसाठी सोमवारी ‘बुद्धभूमी बचाव महामोर्चा’ चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी होणार असून, इतरधर्मीय नागरिकदेखील मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतील, असा दावा या मोर्चाचे नेतृत्व करणारे भदन्त विशुद्धानंदबोधी महाथेरो यांनी केला.
पत्रकार परिषदे भदन्त विशुद्धानंदबोधी म्हणाले, मराठवाड्यातील बौद्धांचे श्रद्धास्थळ म्हणून बुद्धलेणीच्या पायथ्याशी गेल्या ६०-७० वर्षांपासून दरवर्षी ५ ते १० लाख उपासक, उपासिका, तसेच अभ्यासक, पर्यटक भेट देतात. मात्र काही जणांना बौद्धांचे हे श्रद्धास्थळ खुपत आहे. आतापर्यंत दोनवेळा हे श्रद्धास्थळ उठविण्याचा प्रयत्न झाला. आताही या श्रद्धास्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावण्यात आली. जाणीवपूर्वक बौद्धांच्या भावना दुखावण्याचे षडयंत्र रचले जात असल्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रांतीचौकापासून सकाळी ११ वाजता हा मोर्चा विभागीय आयुक्तालयाकडे निघेल. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ भव्य स्टेज उभारले आहे. तेथे मोर्चेकरी थांबतील. त्या स्टेजवर येऊन संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारावे. निवेदन सादर करण्यासाठी आम्ही कार्यालयात जाणार नाही. आपण तथागत गौतम बुद्धांचे अनुयायी असल्यामुळे हा मोर्चा शांततेत निघेल.
यावेळी प्रकाश निकाळजे, गौतम खरात, गौतम लांडगे, दिनकर ओंकार, अरुण बोर्डे, भीमराव हत्तीअंबीरे, दीपक निकाळजे, चेतन कांबळे, संदीप शिरसाट, विजय वाहूळ, अमित वाहूळ, सचिन निकम, डॉ. संदीप जाधव, आनंद कस्तुरे आदी उपस्थित होते. मोर्चास विविध पक्ष-संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. 'एमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, रमेश गायकवाड, आंबेडकरवादी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड, रिपाइंचे (सचिन खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात, जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे, भीमशक्तीचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर ऑकार, राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित विभागाचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण, मराठवाडाध्यक्ष अशोक बोर्डे आदींचा समावेश आहे.