औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर फुलांचे अंथरुण तसेच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तथागत गौतम बुद्धांच्या अस्थीकलश पदयात्रेचे मंगलमय वातावरणात औरंगाबादेतील उपासक- उपासिकांनी आज स्वागत केले. ‘परभणी ते चैत्यभूमी’, अशी ही धम्म पदयात्रा निघाली आहे. यात ११० थायलंड येथील भिक्खू, भारतीय भिक्खू, उपासक तसेच सिनेअभिनेते गगन मलिक यांचा सहभाग आहे.
पदयात्रा गुरुवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाली. जालना रोडवरील केंब्रिज चौकात पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. आज सकाळी पदयात्रा चिकलठाणा, धूत हॉस्पिटल, मुकुंदवाडी, सिडको बसस्थानक चौकात पदयात्रेचे पुष्पवृष्टी, रस्त्यावर फुलांची शिंपण, रांगोळी टाकून मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासकीय दूध डेअरीसमोरील अमरप्रीत चौकात बुद्धांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेतले. दरम्यान, तिसगाव येथे पदयात्रेतील सहभागी भिक्खू संघ व उपासकांचा आजचा मुक्काम असेल.