औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर शुक्रवारी, १४ ऑक्टोबर रोजी हजारो बौद्ध उपासकांच्या साक्षीने श्रावण गायकवाड यांच्यासह शेकडो चर्मकार बांधवांनी बौद्धधम्माची दीक्षा घेतली. या मंगलमय सोहळ्याप्रसंगी ‘बुद्धं सरणं गच्छामी’चा स्वर आसमंतात निनादला.
सायंकाळी भव्य व्यासपीठावर थायलंडच्या राजघराणातील भदन्त विनयसूथी महाथेरो, ‘सिद्धार्थ गौतम’ चित्रपटात तथागतांची भूमिका साकारणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते गगन मलिक, थायलंडच्या लष्कराचे कॅप्टन नताकित, लोकुत्तरा महाविहाराचे भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त नागसेन व भिक्खू संघाचे आगमन झाले. तत्पूर्वी, दुपारपासूनच बौद्ध उपासक-उपासिका तसेच धम्मदीक्षा घेणारे चर्मकार समाजबांधव, महिला, तरुणींनी कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. डॉ. किशोर वाघ यांच्या संचाने भीम-बुद्ध गीते सादर केली.
भिक्खू संघाने व्यासपीठावरील तथागत गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीचे पूजन केले. धम्मदीक्षा विधीचे प्रास्ताविक श्रावण गायकवाड यांनी केले. त्यानंतर धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. भदन्त विनयसूथी महाथेरो व गगन मलिक यांच्याकडून चर्मकार समाजबांधव, महिला, तरुणींनी त्रिशरण, पंचशील ग्रहण केले. त्यानंतर भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्याकडून चर्मकार बांधवांनी २२ प्रतिज्ञा ग्रहण केल्या. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित हजारो जनसमुदायानेही २२ प्रतिज्ञांचे पठण केले. व्यासपीठावर बौद्ध महासभेचे प्रतिनिधी म्हणून किशोर जोहरे, भीमराव हत्तीअंबीरे, मुंबईचे अच्युत भोईटे, संयोजक मिलिंद दाभाडे, विजय मगरे, धनंजय बोरडे, सचिन निकम व धम्मदीक्षा घेणारे चर्मकार समाजबांधव, महिला विराजमान होत्या. शेखर मगर यांनी सूत्रसंचालन केले.