नांदेड : प्रशासनाने २०१६-१७ साठी सुचवलेला ३९७ कोटी ३८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प जशासतसा ठेवत त्यात ९४ कोटी ७५ लाखांच्या विकासकामांची वाढ सुचवत ४९२ कोटी १३ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीने मंजूर करुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे शनिवारी ठेवला. या अर्थसंकल्पावर अभ्यास करण्यासाठी सभागृहाने आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी ३ वाजता महापौर शैलजा स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीने मंजूर केलेला ४९२ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी सभागृहाने आठ दिवसांची वेळ मागून घेतली आहे. प्रशासनाने सादर केलेला ३९७ कोटी ३८ लाखांचा मूळ अर्थसंकल्प जशास तसा ठेवताना स्थायी समितीने काही कामे नव्याने ठेवली आहेत तर प्रशासनाने सुचवलेल्या काही कामांच्या निधीमध्ये वाढ करण्याचे सुचवले आहे. परिणामी स्थायी समितीने जवळपास ९४ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांची वाढ करत हा अर्थसंकल्प सभागृहापुढे शनिवारी ठेवला. या अर्थसंकल्पाबाबत बोलताना सभापती अनुजा तेहरा मराठवाड्यात पहिल्यांदाच एका महिला सभापतीला अर्थसंकल्प सादर करण्याचा मान हा मराठवाड्याचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले. महापालिकेची आर्थिक स्थिती आजघडीला अडचणीची असली तरी त्यावर मात करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह अधिकारी, नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले. १ आॅगस्ट २०१५ पासून स्थानिक संस्था कर बंद झाल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. शहराच्या विकासासाठी निधी आवश्यक असून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे आवश्यक आहे. आजपर्यंत केंद्र व राज्य शासनाने शहराला मोठा निधी दिला आहे. त्यामुळे शहराच्या विकासातही मोठी भर पडली आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असेही सभापती तेहरा यांनी सांगितले. उत्पन्नवाढीसाठी त्यांनी काही सूचना केल्या. स्थायी समितीने मंजूर केलेला हा अर्थसंकल्प स्वीकारत महापौर स्वामी यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ मागून घेतला आहे. त्यानंतर विशेष सभेत हा अर्थसंकल्प मंजूर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर शफी अहेमद कुरेशी, आयुक्त सुशीलकुमार खोडवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी एमआयएमचे नेते खा. ओवेसी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना खा. जावेद अख्तर यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणाचे समर्थन केले. या विषयावर शिवसेनेच्या सदस्यांनी ओवेसीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तर दुसरीकडे एमआयएमच्या नगरसेवकांनी ओवेसी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. काही वेळानंतर हा प्रकार थांबला. दरम्यान, शनिवारी सकाळी स्थायी समितीची सभा झाली. सभापती अनुजा तेहरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध १६ विषयांना मंजुरी देण्यात आली.
९४ कोटींच्या सुधारणांसह महापालिका स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर
By admin | Published: March 20, 2016 12:55 AM