औरंगाबाद : यंदाच्या अर्थसंकल्पात नगर-औरंगाबाद आणि उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या नव्या रेल्वे मार्गांचे सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे, तर दोन मार्गांचे यापूर्वीच सर्वेक्षण झालेले असताना निधी देण्यात आला. त्यामुळे रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाची नुसती फसवाफसवी सुरू असल्याची ओरड होत आहे.
नगर-औरंगाबाद या १०१ कि.मी.च्या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी २१.७५ लाख, तर उस्मानाबाद-बीड-औरंगाबाद या २०० कि.मी.च्या सर्वेक्षणासाठी ४०.१० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याबरोबर औरंगाबाद-बुलडाणा-खामगाव या मागार्साठी ३५.५० लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. औरंगाबाद-चाळीसगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही यंदाच्या अर्थसंकल्पात ८.५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गाची मागणी होत आहे; परंतु अर्थसंकल्पात रोटेगाव-पुणतांबा या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी १२.७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनमाड-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे; परंतु हा मार्गही सर्वेक्षणातच अडकला आहे. अर्थसंकल्पात औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या बदलासाठी एकीकडे यंदा एक हजार रुपयांची तरतूद केली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड, तिरुपती रेल्वेस्टेशनचा विकास करण्यासाठी ७५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. मुदखेड-परभणीच्या दुहेरीकरणासाठी ८० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये या मार्गाचे दुहेरीकरण मंजूर झाले होते. २०१८-१९ मध्ये या मार्गाचे काम पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.