छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल, गॅस, कोळसा यांसारख्या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या स्रोतांसाठी आपण इतर देशांवर अवलंबून आहोत. पवन ऊर्जा प्रभावी नाही. तर, सौर ऊर्जा फक्त दिवसाच्या वेळा उपयोगात आणता येते. शिवाय हिवाळा-पावसाळ्यात मर्यादा असतात. या सर्वांवर प्रभावी पर्याय हवा, या विचारातून हायड्रोजनपासून ऊर्जानिर्मिती करणारे उपकरण तयार केले. मात्र, निधीअभावी हा प्रकल्प प्रभावीपणे पुढे आणता येत नसल्याचे भारतीय क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ, संरक्षण संस्थेच्या प्रगत तंत्रज्ञानाचे माजी कुलगुरू आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे माजी संचालक पद्मश्री प्रल्हादा रामाराव यांनी सांगितले.
ऊर्जेवरील परावलंबित्व संपवणाऱ्या या उपकरणाची माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत रामाराव बोलत होते. ते म्हणाले, मी २७ वर्षे भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. अनेक संशोधन मोहिमांत सोबत काम केले. त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, आपण अनेक संशोधने देश आणि सैन्यासाठी केली. पण, सामाजिक ऋण म्हणून सर्वसामान्यांसाठीही संशोधन केले पाहिजे. हीच प्रेरणा घेऊन मी १० वर्षांपूर्वी संशोधनाला सुरुवात केली.
ऊर्जेकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. फ्रान्स, चीन, अमेरिका सर्वत्र याविषयी संशोधन सुरू आहे. भारतात या सर्व ऊर्जा स्रोतांची मागणी दरवर्षी २५ ते ३० टक्के वाढत आहे. त्यामुळे आपण याविषयी अधिक तीव्रतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. २००८ मध्ये सुरू केलेले संशोधन २०१८ मध्ये आम्ही पूर्ण केले. त्याला कमिटीपुढे सादर केले. संशोधन अचूक असल्याचे सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऊर्जा मंत्रालयाचे पदाधिकारी, अधिकारी सर्वांपुढे हे संशोधन मांडले आहे, असे प्रल्हादा रामाराव यांनी सांगितले.
घरातील प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा निर्मितीहायड्रोजनच्या वापराने हे उपकरण घरातील प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जा निर्मिती करू शकेल. अत्यंत लहानशा उपकरणाने अनेक परिमाणे बदलतील. सरकारच्या मर्यादा आहेत. पण, औद्योगिक क्षेत्रातील जाणकार पुढे आल्यास प्रकल्प लवकरात लवकर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी धडपड सुरू आहे. हे संशोधन पूर्ण क्षमतेने जगापुढे आणण्यासाठी किमान १५ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे, असे प्रल्हादा रामाराव म्हणाले.