औरंगाबाद : औरंगाबाद शहर महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील डीएमआयसी, रेल्वे, विमान कनेक्टिव्हिटीसह, महामार्गाचे जाळे वाढते आहे. पश्चिम भारतातील गुजरात, मध्य प्रदेशात अवघ्या १० तासांत येथून पोहोचता येते. असे हे शहर असून येथे कच्चा माल साठवणूक व वितरणाचे ‘कॅरी ॲण्ड फाॅरवर्डिंग ’ (सी ॲण्ड एफ) हब झाले तर येथील व्यापार व उद्योगाला मोठी गती मिळेल. औरंगाबाद-जालन्याचा विकास झपाट्याने होईल. सी ॲण्ड एफ हबच्या दृष्टीने माळीवाडा ही योग्य जागा आहे, अशी सूचना शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष अजय शहा यांनी या प्रस्तावाचे सादरीकरण केले. सी ॲण्ड एफ हबमध्ये उत्पादनासाठी लागणाऱ्या रॉ मटेरियल व उत्पादित फनिश्ड गुडस् विक्री स्थळापर्यंत पोहोचवण्यासाठी दळणवळणाची विभागीय सुविधा उपलब्ध झाल्यास मराठवाड्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरेल, असे शहा यांनी नमूद केले आहे. सी ॲण्ड एफ हबचा सविस्तर प्रस्ताव तयार करून द्या, मी केंद्र सरकारकडे याविषयी पाठपुरावा करतो, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.
चौकट
सी ॲण्ड एफ हबसाठी औरंगाबादच का?
औरंगाबाद शहर भौगोलिकदृष्ट्या पश्चिम विभागाच्या अगदी मध्यभागी आहे. शहरातून मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत १० तासांत उत्पादित माल पोहोचविता येऊ शकतो. ही या शहराची जमेची बाजू आहे.
चौकट
माळीवाडा
शहरातून तीन नॅशनल हायवे जात आहे. समृद्धी महामार्ग, नियोजित बुलेट ट्रेन, सोलापूर-धुळे महामार्ग, नियोजित जालना- बुलडाणा रेल्वे प्रकल्प, डीएमआयसी, माळीवाडा येथे कंटेनर डेपो, माळीवाडा येथेच नियोजित मालधक्का, या सुविधा शहरात उपलब्ध. समृद्धी महामार्ग, सोलापूर-धुळे महामार्ग जेथून जातो ते माळीवाडा गाव आहे.
चौकट
जमिनीची उपलब्धता
मुंबई, पुणे, इंदूर, अहमदाबादपेक्षा आपल्या शहरात जमिनीची उपलब्धता मोठी आहे व जमिनीच्या किमती या महानगरापेक्षा कमी आहेत. पुढील काळात दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक उद्योगांना व होलसेल व्यापाऱ्यांना मोठी बाजारपेठ बनविण्यास हे शहर उपयुक्त ठरणार आहे.
चौकट
भक्कम औद्योगिक क्षमता
येथे ऑटोमोबाइल हब, फार्मास्युटिकल हब, बियर हब आहे. डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा, बिडकीन पंचतारांकित औद्योगिक वसाहत, जालना येथील स्टील व सीडस् हब, नियोजित ड्रायपोर्ट हे येथील औद्योगिक क्षमता दर्शविते.