बिल्डर किशोर लोहकरे खून प्रकरण; मध्यप्रदेशात गुन्हा दाखल, संशयित कारचालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:52 PM2024-10-11T13:52:22+5:302024-10-11T13:56:23+5:30
बिल्डर किशोर लोहकरे यांच्या खून प्रकरणी संशयाची सुई असलेल्या कारचालकास मध्यप्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वाळूज महानगर: उद्योगनगरीतील बिल्डर किशोर लोहकरे यांच्या खून प्रकरणी मध्यप्रदेशातील सनावद पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी कारचालक जावेद शेख या मध्यप्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
संशयित कारचालक मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात
बिल्डर किशोर लोहकरे यांच्या खून प्रकरणी त्यांचा कारचालक जावेद शेख याच्यावर संशयाची सुई असल्याने त्यास मध्यप्रदेश पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशात सोने खरेदीच्या कारणावरून हा खून झाल्याची सूत्रांची माहिती असून सोने विक्री करणारे मध्यप्रदेशातील तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. खुनाच्या घटनेनंतर ते तिघेही फरार असून संशयित कारचालक जावेद यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती हाती येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मयत किशोर लोहकरे यांच्या पार्थिवावर कमळापुरात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत किशोर लोहकरे यांचा मोठा मित्र परिवार असल्याने अंत्यविधीसाठी मोठी गर्दी झाली होती. याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.