वाळूज महानगर: सिडकोवाळूजमहानगर-१ मध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात सिडको प्रशासनाकडे तक्रारी करुनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
सिडको वाळूजमहानगर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. यासाठी लागणारी वाळु, स्टील व इतर साहित्य रस्त्यावरच टाकले जात आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण आहे. परिसरात खाजगी शाळा असून विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विशेष म्हणजे या भागात खेळण्याचे मैदान असून, या मैदानावर सायंकाळी बच्चे कंपनी गर्दी करतात. या बांधकाम साहित्यामुळे वाहनधारक व नागरिकांची गैरसोय होत आहे.
यासंदर्भात नागरिकांनी सिडको प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र याची दखल घेतली गेली नाही. मध्यंतरी सिडको प्रशासनाकडून रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्याविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र मोहिमेत सातत्य नसल्यानेच परिसरात बांधकाम साहित्य रस्त्यावर पडल्याचे दिसून येते.