सुनील घोडके
खुलताबाद : येथील प्रसिद्ध निजामकालीन शासकीय विश्रामगृहाची इमारत काळवंडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्याने इमारतीवर गवत उगवले आहे. तात्काळ डागडुजी व रंगरंगोटी न केल्यास हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची शक्यता आहे.
खुलताबाद येथे निजाम सरकारने सन १९११ मध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून, खुलताबाद येथे विश्रामगृह बांधले. या इमारतीला आज ११० वर्षे पूर्ण झाले असले, तरी ही इमारत आजही भक्कम स्थितीत उभी आहे. सध्या ही इमारत शासनाच्या ताब्यात असून येथे शासकीय विश्रामगृह आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सा.बां.च्या दुर्लक्षामुळे या निजामकालीन विश्रामगृहास उतरती कळा लागली आहे. इमारतीचा रंग उडून संपूर्णपणे काळवंडली आहे. तसेच इमारतीवर गवत उगवले आहे. देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने इमारतीची दुरवस्था झाली आहे.
चौकट
व्यवस्थापक नाही, कर्मचारीही मोजकेच
गेल्या अनेक वर्षांपासून या शासकीय विश्रामगृहामध्ये व्यवस्थापक नाही. तसेच कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून मोजक्या दोन, चार लोकांवर येथील कारभार सुरू आहे. माळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची तीन वर्षांपूर्वी बदली झाल्याने येथे गवत काढण्यासाठी कर्मचारीच नाही. चोहोबाजूंनी गवत उगवल्यामुळे इमारत खराब दिसत आहे. सा.बां.च्या दुर्लक्षामुळे या ऐतिहासिक इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
-------
चौकट
दहा एकर जागेत विश्रामगृह
खुलताबाद येथील निजामकालीन शासकीय विश्रामगृह परिसर हा जवळपास दहा एकर जागेत असून या ठिकाणी सूर्यास्त तसेच व्ह्यू पॉइंटवरून निसर्गसौंदर्य बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतात. विश्रामगृहाच्या आवारात अनेक दुचाकी चारचाकी वाहनचालक वेगाने वाहने चालवितात. तसेच टवाळखोरही परिसरात धिंगाणा घालत असतात. मात्र, कोरोना काळामुळे विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप असल्याने हे प्रकार सध्या थांबले आहेत.
फोटो कॅप्शन : खुलताबाद येथील निजामकालीन विश्रामगृहाची काळवंडलेली इमारत.