लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे सभागृहातील प्लास्टर आॅफ पॅरिसच्या छताचा काही भाग बुधवारी मध्यरात्री कोसळला. महापौर, उपमहापौर आणि आयुक्त ज्या व्यासपीठावर बसतात त्याच्या जवळच छताचा मलबा कोसळला. सर्वसाधारण सभा सुरू असताना ही दुर्घटना घडली असती तर या विचारानेच मनपा प्रशासनाचा थरकाप होत आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता तातडीने सभागृहातील मलबा काढून फेकण्यात आला.१९८२ मध्ये नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत करण्यात आले. नगर परिषदेचा कारभार पूर्वी टाऊन हॉल येथे चालत होता. महापालिकेला मोठी इमारत हवी म्हणून तातडीने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या दुसºया मजल्यावर सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मोठे सभागृह बांधण्यात आले. सभागृहाची उंची जवळपास ३० फुटापर्यंत आहे. छताच्या खाली संपूर्ण प्लास्टर आॅफ पॅरिसने काम करण्यात आले आहे. त्यात सभागृह विजेच्या प्रकाशाने लख्ख व्हावे म्हणून या प्लास्टर आॅफ पॅरिसमध्ये आकर्षक लायटिंगही करण्यात आली आहे. दर महिन्याला याच सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात येते.१९ आॅगस्ट रोजी वंदे मातरम्च्या मुद्यावर झालेल्या गोंधळाने सभा तहकूब करण्यात आली होती. ही सभा शनिवार २९ आॅगस्ट रोजी घेण्याचे निश्चित झाले. गौरी बसणार असल्याने सभा पुढे ढकलली. १ सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यापूर्वीच रात्री सभागृहाचा काही भाग कोसळला. एखाद्याच्या अंगावर हा मलबा पडला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. मनपा प्रशासनाच्याही बाब लक्षात येताच गुरुवारी सकाळी मलबा काढून फेकण्यात आला.
मनपा सभागृहाचे छत कोसळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:09 AM