केऱ्हाळा : मागील काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर संपावर असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शुक्रवारी सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील एका शेतकऱ्याच्या बैलाला सर्पदंश झाल्याने त्यांनी परिसरातील सर्व खासगी पशुवैद्यकांशी संपर्क साधला; मात्र संपामुळे कोणीही इलाज न केल्याने चार तास बैल तडफडून डोळ्यासमोर मेला. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
केऱ्हाळा येथे शुक्रवारी दुपारी इनूसखाँ हबीबखाँ पठाण यांच्या मालकीची बैलजोडी शेतात बांधलेली होती. यातील एका बैलाला सापाने डंश केल्याचे पठाण यांच्या लक्षात आले. बैल तडफडत असल्याने त्यांनी अनेक डॉक्टरांना फोन केला. सर्वांकडून एकच उत्तर आले, आमचा संप आहे. यामुळे कोणीही उपचारासाठी आले नाही. यामुळे हतबल झालेल्या पठाण यांच्या डोळ्यासमोर बैल चार तास तडफडून मेला. यात पठाण यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने पठाण यांना मदत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चौकट
शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणाले, मी नाही येऊ शकत
केळगावजवळील पळशी येथे जिल्हा परिषदेचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तेथे व्यवस्थित सेवा मिळत नसल्याने जनावरे आजारी पडल्यानंतर शेतकरी बहुतांश वेळा खासगी पशुवैद्यकांचीच सेवा घेतात. खासगी पशुुवैद्यकांनी संपामुळे उपचार करण्यास नकार दिल्यानंतर शेतकरी पठाण यांनी पळशी येथील शासकीय पशुवैद्यकाशी संपर्क साधला. मात्र, मी येऊ शकत नाही, माझी वेळ संपली आहे. तुम्ही एखाद्या खासगी डॉक्टरला बोलवा असे, ते म्हणाल्याचे शेतकरी पठाण यांनी सांगितले.
चौकट
तीन महिन्यांपूर्वीच एक लाखांत घेतली बैलजोडी
इनूसखाँ पठाण या शेतकऱ्याने तीन महिन्यांपूर्वीच एक लाख रुपयाची बैलजोडी खरेदी केली होती. मात्र त्यातील एक बैल सर्पदंशाने गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.