औरंगाबाद : नारेगाव परिसरातील रिंग रोडलगतच्या परिसरात मागील अनेक दिवसांपासून जमिनीचे सपाटीकरण करून बेकायदा प्लॉटिंगची विक्री केली जात होती. ही तक्रार प्राप्त झाल्याने या भागातील बेकायदा प्लॉटिंग महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुधवारी निष्कासित केली. विशेष म्हणजे, या परिसरातील बेकायदा प्लॉटिंगधारकांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय पालिकेने घेतला आहे.
गट क्रमांक २३२, रिंग रोडलगत केंब्रिज स्कूल ते पिसादेवी रोडवर शेतजमीन आहे. येथील जमिनीचे सपाटीकरण करून सिमेंटचे रस्ते तयार करून बेकायदा प्लॉटिंगची विक्री सुरू होती. याबाबत पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना तक्रार प्राप्त झाली होती. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना तत्काळ स्थळपाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधितांना नियमानुसार पालिकेची परवानगी घेऊन प्लॉटिंग करण्याची सूचना केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पालिकेच्या पथकाने बुधवारी कारवाई करीत बेकायदा प्लॉटिंग जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित केली. तसेच नारेगाव परिसरातही गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला चिकलठाणा एमआयडीसी भागात गट क्रमांक ४१, प्लॉट क्रमांक एच ६ लेझर कंपनीच्या जागेत बिल्डर संतोष मुथियान यांनी बेकायदा प्लॉटिंग थाटली होती. यासाठी मुथियान यांनी कोणत्याही विभागाची परवानगी घेतलेली नसल्याचे चौकशीतून निदर्शनास आले. त्यामुळे येथील प्लॉटिंगही निष्कासित केली. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, आर. एम. सुरासे, मझहर अली यांच्यासह अतिक्रमण विभाग पथकाचे पोलीस कर्मचारी, मजुरांनी केली.