छत्रपती संभाजीनगर : शहर विकास आराखड्यात आलेल्या आरक्षणामुळे कुणाच्याही घरावर बुलडोझर चालू देणार नाही. सर्व हिताचा ‘डीपी प्लॅन’ झाल्यावर मी त्यावर सही करीन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिली.
टीव्ही सेंटर चौकात मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शहर विकासासाठी आजवर घेतलेल्या निर्णयावर प्रकाश टाकला. शहर पाणीपुरवठा योजनेचे ८२२ कोटी रुपयेही सरकार देणार असल्याचे ते म्हणाले.
सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा तयार केला जाईल. हे घर देणारे सरकार आहे, लोकांना बेघर करणारे नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. डीपी प्लॅनमध्ये शिवाजीनगर भागातील अनेक लोकांच्या घरांवर आरक्षण आले. त्यामुळे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन देऊन लोकांची घरे वाचविण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीला उत्तर देत एकही घर पडू देणार नाही, असा शब्द दिला.
आपण भाग्यवान आहोत...कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं कोणतंही काम मी केलेलं नाही. मी जे काही करतोय ते माझं कर्तव्य आहे. इथे जी काही कामं होत आहेत तो तुमचा अधिकार आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढं चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की, बाबासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलं, असे उद्गार यावेळी शिंदे यांनी काढले.
यामुळे व्यक्त केली कृतज्ञता...अजिंठा येथील भीमपार्कसाठी ५० कोटी, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी ५ कोटी, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळा व अशोक स्तंभासाठी ५ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डिजिटल प्रोजेक्टसाठी २५ कोटी, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
गौतम खरात, जालिंदर शेंडगे, अरुण बोर्डे, महेंद्र सोनवणे, विजय मगरे, कृष्णा बनकर, अशोक भातपुडे, कृष्णा भंडारे, संतोष भिंगारे, ॲड. विजय जोंधळे, डॉ. संदीप जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. पंचशिला भालेराव यांनी ‘शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले. या कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रवीणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाकडून स्वागतमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी ६:२५ च्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मंत्री, आमदारांसह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आदी उपस्थित होते.