औरंगाबाद : बजाज फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या मोबाइलचा एक हप्ता थकल्यामुळे ग्राहकास वसुली एजंटाने इतर सहा ते सात जणांना बोलावून घेत बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील कॅनॉटमध्ये दुपारी घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अनिकेत नंदकिशाेर शहाणे (रा. कैलासनगर) याने आईच्या नावाने बजाज फायनान्सकडून एक मोबाइल घेतला होता. एक हप्ता थकल्यामुळे एसएसडी मोबाइल शॉप येथे राहणारा बजाज फायनान्सचे काम करून देणाऱ्या प्रशांतने फोन करून थकलेल्या हप्त्याचे पैसे भरण्यास सांगितले. तसेच अनिकेतला शिवीगाळ केली. त्यावरच प्रशांत न थांबता त्याने अनिकेतच्या आईचा फोटोही साेशल मीडियात व्हायरल केला. याचा जाब विचारण्यासाठी अनिकेत व भाऊ अभिषेक हे बुधवारी दुपारी कॅनॉट येथील मोबाइल शॉपीत पोहोचले. तेव्हा प्रशांतसोबत शहाणे बंधूंची बाचाबाची झाली.
प्रशांतने ब्रिजवाडी येथील सहा ते सात जणांना बोलावून घेत दोघा भावांना बेल्ट, लाथा, बुक्क्या आणि लिंबू पिळायच्या अवजाराने बेदम मारहाण केली. दोघांवर सात ते आठ जण तुटून पडल्यामुळे परिसरातही दहशत पसरली. सिडको ठाण्याच्या विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार सहकाऱ्यांसह आले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलिस दिसताच वसुली एजंट पळून गेल्याचे उपस्थितांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना लवकरच पकडण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.