वाळूज महानगर : विविध ठिकाणांवरुन चोरलेल्या दुचाकीचे स्पेअर पार्टस् विकणाऱ्या चोरट्यास मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पंढरपूर परिसरात जेरबंद केले. गोटीराम राजाराम मासुळे (३३ रा.पंढरपूर), असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पंढरपूरात परिसरात एक इसम वेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकीचे स्पेअर पार्टस् विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पंढरपुरात सापळा रचला. यासाठी पोलिसांनी मॅकेनिकची मदत घेतली.
दरम्यान, संशयित इसम पंढरपूरात दिसून येताच बनावट ग्राहक बनलेल्या मॅकेनिकने त्याच्याकडे जाऊन स्पेअर पार्टस् खरेदीची तयारी दर्शविली. त्याने पंढरपूरातील खामनदीलगतच्या पात्रात झाडा-झुडपात लपवून ठेवलेल्या दुचाकी दाखविल्या.मॅकेनिकने दुचाकीचे स्पेअर पार्टस् खोलण्यासाठी गॅरेजवरुन मुले तसेच साहित्य घेऊन येतो, असे म्हणून पंढरपुरात आला. मॅकेनिकाने डीबी पथकाला संशयित आरोपीची माहिती दिली.
ही माहिती मिळताच पोलिस पथकाने मॅकेनिकला सोबत घेऊन संशयित आरोपी गोटीराम राजाराम मासुळे याला एका दुचाकीसह शिताफीने जेरबंद केले.