पैठण: शहरातील आडत व्यापारी मयुर चेऊलवार यांच्या शशी विहार येथील रो-हाऊस मध्ये चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. चेऊलवार यांच्या मुलावर छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याने ते घराला कुलूप लावून गेले होते. चोरट्यांनी घरातील रोकड आणि दागिने असा चार ते पाच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. जाताजाता शेजाऱ्याची मोटारसायकल सुध्दा चोरून नेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
शशिविहार येथील आडत व्यापारी मयुर चेऊलवार व वकील असलेल्या त्यांच्या पत्नी आदिती चेऊलवार हे दाम्पत्य मुलाच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी होते. दरम्यान, गुरूवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या कुलुपाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील रोख ५० हजार आणि लाखो रुपयांच्या सोन्याचांदीच्या ऐवजावर डल्ला मारला. जाताजाता चेऊलवार यांचे शेजारी समीर उजिवाल यांची दुचाकी ( क्र एम एच २० - एफ व्ही ७०१७ ) देखील चोरट्यांनी पळवली. दरम्यान, दुचाकी नेताना तीन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहेत. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत चोरीची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलीसांना खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंडे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकूल, सुधीर वाव्हळ, अनिरुद्ध पवार, आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. श्वान पथकाने पैठण-शेवगाव रोडपर्यंत माग काढला. मयुर चेऊलवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात ठाणे अंमलदार अनिरुद्ध पवार यांनी गुन्हा दाखल केला आहे.