औरंगाबाद: बीड बायपासवरील पटेल लाॅन्स जवळील फॉरवर्ड कोच बिल्डर व प्रेसिडेंट मोटर्स या दोन गॅरेजला पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत दोन्ही गॅरेज जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती .
आगीची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले . मात्र गॅरेजमधील ऑईल , वाहनाचे ईंधन आणि प्लास्टिक व फायबर वस्त्तूमुळे आग आधिक वेगाने भडकल्याने पाणी अपुरे पडले.त्यानंतर पाण्याचे 3 टॅंकर मागवून बंबात टाकण्यात आले.
सुमारे तासाभराच्या प्रयत्नमुळे आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमक दलाला यश मिळाले. घटनास्थळी उप अग्नीशमन आधिकारी एल. एम. गायकवाड आणि अन्य जवानानी यासाठी परिश्रम घेतले . यावेळी नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली. यात जिवीतहानी झाली नाही.