वाळूज महानगर (औरंगाबाद) : करोडीच्या पत्नीपीडित पुरुष आश्रमात विजयादशमीला पत्नीपीडितांनी एकत्रित येत शूर्पणखावृत्तीचे दहन केले. पुरुषांचा महिलांकडून होणारा छळ थांबविण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी पुरुषांसाठी नवीन कायदे करण्याचा सूर पत्नीपीडितांनी आळवला.
पत्नीपीडित ॲड. भारत फुलारे यांनी मुंबई- नागपूर महामार्गावरील करोडी येथे आश्रम उभारला आहे. या आश्रमात पत्नीपीडित पुरुषांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर सल्ला देण्याचे काम ॲड. फुलारे हे करीत आहेत. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पत्नीकडून पतीचा छळ केला जात असल्याचे ॲड. फुलारे यांचे म्हणणे आहे. महिलांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे अत्याचार थांबविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कायदे करण्यात आले. या कायद्याचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आल्याचा आरोप ॲड. फुलारे यांनी केला. पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी, यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी विजयादशमीच्या दिवशी एकत्रित येत शूर्पणखावृत्तीचा दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ॲड. भारत फुलारे, चरणसिंग राजपूत, सुरेश फुलारे, रामेश्वर नवले, भाऊसाहेब साळुंके, सोमनाथ मनाळ, संजय भांड, मदन पापडकर, विशाल नांदरकर, ॲड. दत्तोपंत दहीफळे, ॲड. गणेश डहाळे आदींची उपस्थिती होती.
महिलांप्रमाणे पुरुषांसाठी स्वतंत्र कायदे करापुरुषांचा महिलांकडून होणारा छळ थांबविण्यासाठी स्वतंत्र कायदे करण्याची मागणी पत्नीपीडितांनी केली. प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष सुरक्षा समितीची स्थापन करून लाय डिटेक्टर बसविण्यात यावे, घरगुती हिंसाचारापासून पुरुषाचे संरक्षण करण्यासाठी अधिनियम लागू करण्यात यावेत, कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या महिलांवर कडक कारवाई करावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे ॲड. फुलारे यांनी सांगितले.