वाळूज महानगर : शहरातून कुलर व एअर कंडिशन घेऊन बजाजनगरकडे येणाऱ्या लोडींग रिक्षाला मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोलवाडी फाट्याजवळ अचानक आग लागली. यात रिक्षासह कुलर व एसी भस्मसात झाले असून, जवळपास साडे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
बजाजनगरातील व्यवसायिक नरेश ललवाणी यांनी मंगळवारी शहरातील डिलरकडून कुलर व एअर कंडीशन खरेदी केले होते. ते बजाजनगरकडे लोडिंग रिक्षातून (एम.एच.२०, डी.ई.१६६२) घेऊन येत असताना रेल्वे उड्डाण पूल ते गोलवाडी फाट्याजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिक्षाला आग लागली. रिक्षाच्या समोरील भागातून धूर व आगीच्या ज्वाला बाहेर येत असल्याने चालक नरेश ललवाणी यांनी प्रसांगवधान राखत रिक्षातून उडी मारली. त्यानंतर त्यांनी रिक्षातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीनेरौद्र रुप धारण केले. नगररोडवर इतर वाहनधारकांनी वाळूज अग्निशामक विभाग व वाहतूक शाखेला माहिती दिली. अग्निशामक जवानांनी पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीत साडेचार लाखाचे नुकसानया आगीच्या घटनेत रिक्षातील ४ एअर कंडीशन, ७ कुलर असे जवळपास २ लाखांचे साहित्य तसेच २ लाख ५० हजारांची रिक्षा भस्मसात झाली आहे. रिक्षाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यवसायिक ललवाणी यांनी वर्तविला आहे.