----
औरंगाबाद : नोकरीचे आमिष दाखवत युवतीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करीत महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे क्रांतीचौकात भाजपातर्फे दहन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी क्रांतीचौकात तीव्र आंदोलन केले. पीडितेला त्वरित न्याय द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी तसेच या अत्याचारप्रकरणी नव्या कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपाकडून यावेळी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिसांनी पुतळा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात चांगलीच खेचाखेची झाली.
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटक भाऊराव देशमुख, माजी महापौर भगवान घडामोडे, प्रमोद राठोड, प्रविण घुगे, शिवाजी दांडगे, दिलीप थोरात, समीर राजुरकर, राजेश मेहता, युवा राजगौरव वानखेडे, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, अमृता पालोदकर, मनिषा मुंडे, मनिषा भन्साली, हर्षवर्धन कराड, मनोज भारस्कर, जालिंदर शेंडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
पोलीसांवर दबाव : बावनकुळे
---
शिकवणीवर्ग घेणाऱ्या तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख विरुद्ध तक्रार दिल्यानंतर ३ दिवस सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल झाल्यावरही आरोपीला अटक होत नाही. आरोपी सत्ताधारी पक्षाचा नेता असल्याने पोलिसांवर सरकारचा दबाब आहे, असा आरोप भाजप नेते बावनकुळे यांनी केला. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था ढसाळत चालल्याचा आरोप केला.