औरंगाबाद : धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या बसच्या चेसिंसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे बसची चाके एकीकडे आणि बॉडी दुसरीकडे अशा अवस्थेत वेगाने बसच चालवत २९ प्रवाशांच्या जिविताशी खेळ सुरू होता. शरणारपुर फाट्याजवळ रस्त्याच्या कडेने जात असलेल्या दुचाकीस्वाराला बसच्या डाव्या बाजूने पाठीमागील बाजूने ठोकले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यामुळे बस थांबली अन् २९ प्रवाशांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ संपुष्टात आला.
औरंगाबादहुन धुळ्याच्या दिशेने २९ प्रवाशांना घेऊन बस (क्रं. एम.एच.१४, डी.टी.२११९) मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान निघाली होती. रस्त्यावरुन चालताना बसचे तोंड रस्त्याच्या मध्यभागी दिसत होते आणि बसचा पाठीमागील भाग डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला आलेला होता. ही बस शरणापुर फाट्याच्या अलीकडेच एका दुचाकीला उडवणार असे दिसत असतानाच तो दुचाकीस्वार बचावला. त्याच्या पुढे काही अंतरावरच दुसऱ्या दुचाकीस्वाराला (क्रं.एम.एच.२०, एफ.क्यु.६९८३) बसने उडविले.
या दुचाकीवरील गंगापुर तालुक्यातील पाचपिरवाडी येथील साहेबसिंग भाऊसिंग कवाळे (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. जिल्हा परिषदेत पगारपत्रक दाखल करण्यासाठी ते आले होते. या अपघातात त्यांचे डोके रस्त्यावर आपटले, मात्र हेल्मेट असल्यामुळे डोक्याला मार लागला नाही. मात्र जोराने रस्त्यावर पडल्यामुळे उजव्या हात मनगटापासुन मोडला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. अपघातानंतर कवाळे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात बसचा चालक दिपक रमेश पाटील (३८,रा. फागणे, ता.जि. धुळे) याच्या विरुद्ध गाडी चालवताना निष्काळजीपणा करीत अपघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीास कर्मचारी के.बी. काळे करीत आहेत.
व्हिडिओ तुफान व्हायरलवाकड्या चेसिसची बस रस्त्यावर चालताना पाठिमागून येणाऱ्या एका वाहनधारकाने त्याचा व्हिडिओ शुट केला आहे. याच व्हिडिओत दुचाकीस्वराला पाठीमागून ठोकतानाचे दृश्य कैद झाले आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियात तुफान व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी एस.टी. महामंडळाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.
बस थांबविणे गरजेचेऔरंगाबाद -धुळे बसच्या चेसिसचा सेंट्रल बोल्ट तुटल्यामुळे चेसिस वाकडी झाली होती. त्यामुळे ही बस जाग्यावरच थांबविणे आवश्यक होते. बस खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे बोल्ट तुटल्याची शक्यता आहे. या प्रकरणात चालकाने दिरंगाई केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी धुळे विभागाला माहिती देण्यात आली आहे. यावर तेच निर्णय घेतील.- अरुण सिया, विभागनियंत्रक, एस.टी. महामंडळ