माजलगाव : येथील नवीन बसस्थानकामध्ये आठ दिवसांपासून वीज नसल्याने रात्री बसस्थानकात अंधार पसरलेला असतो़ याचा फायदा घेऊन भुरटे चोर आपला फायदा साधत असून महिला व मुलींच्या छेडछाडीमध्ये वाढ होत आहे़ याकडे मात्र आगारप्रमुख दुर्लक्ष करीत असून विविध कारणे सांगण्यास त्यांनी सुरूवात केली आहे़'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशी हेच आमचे दैवत समजून रात्रंदिवस धावणारी बस दिवसेंदिवस प्रवाशांना सोयीसुविधा देण्यात कमी पडत आहे़ त्यामुळे प्रवाशांचा खाजगी वाहनांकडे जाण्याचा कल वाढला आहे़ याचा फटकाही महामंडळाला सहन करावा लागत आहे़ याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारीही विविध कारणे सांगून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे़माजलगाव शहरातील नवीन बसस्थानकातील वायरिंगमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने येथील वीजपुरवठा अनेक दिवसांपासून विस्कळीत होत आहे़ यावर आगाराकडून तात्पुरती व्यवस्था करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येतो़ मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे़ वायरिंगवर विजेचा भार वाढल्याने वायर खराब होतात़ याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो़ मागील आठ ते दहा दिवसांपासून येथील बसस्थानकातील वायरिंगमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण बसस्थानकात अंधार पसरलेला असतो़ रात्री सात वाजल्यानंतर येथे येणाऱ्या प्रवाशांचे पॉकेट मारणे, बॅग पळविणे यासारखे विविध प्रकार घडत आहेत़ प्रवाशांना गावी जायचे असल्याने चोरीच्या तक्रारी देण्यासही ते टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे़रात्री बसस्थानकात येणाऱ्या महिलांना एकटे पाहून त्यांची छेड काढण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढले आहेत़ महिलाही तक्रार देण्यास टाळत आहेत़ बसस्थानकातील अंधाराचा फायदा घेत भुरटे चोर डाव साधत आहेत़पोलीस कर्मचारी गैरहजरहे सर्व प्रकार होत असताना येथे नेमण्यात आलेले दोन पोलीस कर्मचारी कधीही स्थानकात हजर नसतात़ याचा फायदा घेत भुरटे चोर, रोडरोमिओ यांच्या संख्येत वाढ झाली आहे़ बसस्थानकात वीज नसून पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आलेली नाही़ मोटार बंद असल्याने प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे़ पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ एवढे गंभीर प्रकार घडत असतानाही आगार प्रमुख व येथे नेमण्यात आलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे़ वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे़याबाबत आगारप्रमुख पी़ ए़ भोंडवे म्हणाले, बसस्थानकातील वायरिंग खूप जुनी आहे़ त्यामुळे त्याच्यात वारंवार बिघाड होत आहे़ यासाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याने त्याच्या परवानगीसाठी वरिष्ठांना कळविले आहे़ (वार्ताहर)
आठ दिवसांपासून बसस्थानक अंधारात
By admin | Published: September 13, 2014 10:56 PM