औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत बससेवा सुरू करण्यास अक्षम्य विलंब होत असल्याने मंगळवारी महापालिकेने तातडीने एस.टी. महामंडळाच्या तीन बसेस घेऊन शहर बससेवा सुरू केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शहर बसचे उद्घाटन सायंकाळी टी.व्ही. सेंटर चौकात करण्यात आले. महापालिकेने ठरवून दिलेल्या मार्गावरच या बसेस धावणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे शहर बस सुरू करण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. स्मार्ट सिटी योजनेत पाच इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याने भाडेतत्त्वावर काही बसेस घेऊन शहर बससेवा सुरू करण्यासाठीही चाचपणी करण्यात आली. त्यातही प्रशासनाला यश आले नाही. शेवटी महापौरांनी लाईफ लाईन वापरत थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधून एस.टी. महामंडळाच्या काही बसेस शहर बससेवेसाठी द्याव्यात, अशी विनंती केली. रावते यांनीही ती मान्य करीत मनपाला तीन बस उपलब्ध करून दिल्या.
सायंकाळी ७ वाजता सेनानेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, सभागृहनेते विकास जैन, सुहास दाशरथे, नगरसेवक मोहन मेघावाले, सचिन खैरे, सिद्धांत शिरसाट, आयुक्त डी.एम. मुगळीकर, शहर अभियंता एस.डी. पानझडे, एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक आर.एन. पाटील, किशोर नागरे, गोपाळ कुलकर्णी, राजू खरे, गणपत खरात यांची उपस्थिती होती.
एस.टी.च्या २८ शहर बसमहापालिकेची शहर बससेवा बंद पडल्यापासून एस.टी. महामंडळ शहर बससेवा तोट्यात चालवत आहे. अनेकदा महामंडळाने मनपाला ही सेवा सुरू करावी, अशी विनंती केली. बससेवा सुरू करणार नसल्यास किमान तोटा तरी भरून काढावा, अशी मागणी केली होती. सध्याही २८ शहर बस रस्त्यांवर धावत आहेत. उद्यापासून महापालिकेच्या तीन शहर बस महासमंडळच चालविणार आहे. नाव महापालिकेचे आणि तोटा एस.टी. महामंडळाचा, अशी ही अभिनव योजना आहे.
असे असतील मार्गमिटमिटा ते केम्ब्रिज शाळामार्गे बाबा पेट्रोल पंप.नक्षत्रवाडी ते हर्सूल, मार्गे बाबा पेट्रोल पंप, दिल्लीगेट.झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम, मार्गे बीड बायपास.