लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्था अंत्यत बिकट झाली असून, ते अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसते. पावसाळा नसतानाही बसस्थानकाच्या भिंती आणि छतातून पाणी गळत आहे. याठिकाणी बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून बसपोर्टची नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.जानेवारी २०१६ मध्ये औरंगाबादसह इतर काही शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्स्फर-लीज’ या तत्त्वावर बसपोर्ट बांधण्यात येणार आहे. बसपोर्ट जाहीर केल्याच्या वर्षभरानंतर म्हणजे जानेवारी २०१७ मध्ये एस. टी. महामंडळातर्फे औरंगाबादसह राज्यातील ९ शहरांत उभारण्यात येणाºया बसपोर्टसाठी निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली; परंतु वर्ष होत असताना बसपोर्ट उभारण्याचा मार्ग अद्यापही मोकळा झालेला नाही. परिणामी, इमारतीची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे.छताचे प्लास्टर प्रवाशांच्या अंगावर पडणे, छताबरोबर खांब आणि भिंतीमध्ये पाणी झिरपण्याचे प्रकार होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावरील पाण्याच्या टाक्यांतील गळतीमुळे इमारतीच्या भिंती आणि छतातून पाणी झिरपत आहे. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकातील अधिकाºयांनी ही बाब वरिष्ठांना कळविली आहे. पावसाळा नसताना बसस्थानकातून पाणी झिरपताना पाहून प्रवासी आश्चर्यचकित होत आहेत. बसस्थानकाच्या दुरवस्थेविषयी प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अधिकारी म्हणतात...याविषयी एसटी महामंडळाच्या स्थानिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वरिष्ठ कार्यालयस्तरावर बसपोर्टची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मुंबई प्रदेशचे विभागीय अभियंता माधव ताटके म्हणाले, बसपोर्टची निविदा प्रक्रिया सुरू आहे; परंतु याविषयी काही सांगता येणार नाही.
बसस्थानकाला अवकळा, बसपोर्टची नुसती प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:26 AM