लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : नाफेडतर्फे येथे तूर खरेदी सुरू होती. मात्र चार दिवसांपासून खरेदी बंद झाली होती. मंगळवारपासून मार्केटींग फेडरेशनकडे तूर खरेदीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तूर उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने तूर खरेदी करण्यासाठी नाफेडच्या दि विदर्भ को आॅप. मार्केटींग सोसायटी या संस्थेमार्फत जानेवारीमध्ये केंद्र सुरू केले होते. आतापर्यंत ७२ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान ३१ मेपर्यंत नाफेडची तूर खरेदी सुरू राहणार आहे. मात्र नाफेडच्या खरेदी केंद्रावर स्थानिक शेतकऱ्यांऐवजी बाहेरच्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे चार दिवसांपासून नाफेडची तूर खरेदी बंद होती. मंगळवारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्रीमती एस.के. पांडव यांनी कृउबा आवारातील नाफेडच्या खरेदी केंद्राला भेट दिली. खरेदी-विक्री संघास तूर खरेदी करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र संघाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे सचिव भागवत भोसले यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे अखेर मार्केटिंग फेडरेशनकडे तूर खरेदीची जबाबदारी देण्यात आली. दुपारी ३ वाजता खरेदीला सुरुवात झाली. एस.के.पांडव यांच्यासह कृउबा सभापती अशोक डक, उपसभापती नीळकंठ भोसले, एस.बी. गोलेकर उपस्थित होते. शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पांडव यांनी केले.
नाफेडऐवजी फेडरेशनकडून तूर खरेदी
By admin | Published: May 16, 2017 11:16 PM