छत्रपती संभाजीनगर : १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात मनपा हद्दीत सरासरी ३.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ग्रामीण भागासह प्रभाव क्षेत्रात सरासरी तीन टक्के रेडीरेकनर वाढला आहे. ग्रामीण आणि महापालिका हद्दीसाठी किती दरवाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या शहर व परिसरात फ्लॅटचे दर वाढलेले आहेत. दुकाने, खुल्या जागेच्या दरातही वाढ झाल्याने जागा घेऊन घर बांधणे तर अवघड होत चालले आहे. वाढलेला सरासरी रेडीरेकनर दर आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत असलेल्या जुन्या दरांचा विचार केल्यास शहर परिसरात घरांच्या किमतीमध्ये बऱ्यापैकी वाढ होण्याचा अंदाज आहे. २०२५-२६ या वर्षासाठी हे दर असणार आहेत.
मनपा हद्दीत जमीन दर अधिक बांधकाम दर याचा विचार दरवाढ करताना केला आहे. तसेच सर्व्हे नंबर, गट नंबर, सिटी सर्व्हे नंबरप्रमाणे बदलांची नोंद घेतली आहे. गुलमंडी, कुंभारवाडा, पैठणगेट, औरंगपुरा, समर्थनगर, सिटी चौक, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, शहानूरमियाँ दर्गा, सूतगिरणी, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा बीड बायपास, बाळापूर, गांधेली, सातारा, देवळाई, वाळूज, शेंद्रा व इतर भागात घर, फ्लॅट घेणाऱ्यांना १ एप्रिलपासून वाढीव रेडिरेकनरसह मालमत्ता खरेदी करावी लागणार आहे. दरम्यान, रेडीरेकनरमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता मार्च अखेरपूर्वीच मालमत्ता खरेदीची नोंदणी व्हावी, यासाठी नोंदणी कार्यालयात नागरिकांची गर्दी होती.
मागच्यावर्षी दिले होते इलेक्शन गिफ्टशासनाने मागीलवर्षी रेडीरेकनर (आरआर रेट / शीघ्रगणक दर) जैसे थे ठेवले होते. २०२२ साली जिल्ह्यात १२.३८ टक्के, तर महापालिका हद्दीत ८.८० टक्के केलेली दरवाढ कायम ठेवली होती. इलेक्शनच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील चारही दिशांमध्ये घर, फ्लॅट, जागा घेणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. २०२३ मध्येदेखील कुठलीही दरवाढ केली नव्हती. २०२०, २०२१ मध्ये कोरोनामुळे दरवाढ झाली नव्हती. २०२२ ला चौरस मीटरने आरआर रेट वाढल्यामुळे घरकुल घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे २०२३ ला तेच दर ठेवले. गेल्यावर्षी लोकसभा-विधानसभा निवडणुकीमुळे जुनेच दर ठेवले गेले.