- शेख मुनीरछत्रपती संभाजीनगर : सध्या शहरात कोणत्याही वेळी वाहन रस्त्यावर काढल्यानंतर वाहतूक कोंडीचीच भीती प्रत्येकाला सतावत आहे. ही परिस्थिती शहरभर असतानाच मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा भागातील 'वन वे' रस्त्याची तर बिकट अवस्था बनलेली आहे. सिटी चौक, टिळक पथ, बुढीलेनसह इतर भागांतील वनवे रस्त्यावर 'टू वे' ने वाहने सुसाट घेऊन जात असल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळले.
जुन्या शहरातील सिटी चौक, टिळक पथ, बुढीलेन, जुनाबाजार, पैठण गेट, लोटाकारंजा, शहागंज, मछली खडक, रंगारगल्ली, नवाबपुरा भागातील छोट्या रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी या भागातील रस्ते वाहतुकीसाठी 'वनवे' करण्यात आले होते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने या रस्त्याची पाहणी केल्यानंतर कोठेही 'वनवे' हा प्रकार दिसून आला नाही. सगळीकडे दोन्ही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असते. पोलिस ठाणे, चौकीच्या समोरूनही वाहनचालक कोणतीही भीडभाड न पाळता 'नो एंट्री'त वाहन घेऊन जातात. त्याकडे पोलिसही दुर्लक्ष करतात. त्यामुळे छोट्या रस्त्यावरही वाहतुकीची प्रचंड कोडी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलिस सायकलची हवा सोडून द्यायचेऔरंगपुरा भागातील 'नो एंट्री'त सायकलवरून 'एंट्री' केल्यावर ३५ वर्षांपूर्वी पोलिस सायकलच्या चाकांची हवा सोडून देत होते. मी आज दुचाकीवर फिरतो, मात्र ‘वन वे’त कधीच जात नाही. तेव्हा पोलिसांनी बसवलेली जरब आजही माझ्या मनात आहे. त्या काळात एकच पोलिस कर्मचारी औरंगपुरा परिसरातील वाहतूक हँडल करीत होता. आता पोलिसांचा तसा धाकही राहिलेला दिसत नाही.- रूपचंद राठोड, नागरिक
आता पोलिसांची भीतीच नाही६० वर्षांपासून शहर बघत आलो आहे. जुनाबाजार, सिटी चौक, गुलमंडी, मंजूरपुरा या भागांत पूर्वी एंट्री नव्हती. 'नो एंट्री'त 'एंट्री' केल्यावर पोलिस कडक शिक्षा करीत होते. अनेकवेळा सायकल, दुचाकीची हवा सोडून देत. तेव्हा पोलिसांची भीतीही मोठ्या प्रमाणात होती. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर असतानाही वाहनचालक घाबरत नाहीत, हे दुर्दैव आहे.- मिया खान अब्दुल रहीम खान, नागरिक.