औरंगाबाद : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत हाेईल, या दृष्टीने स्मार्ट सिटीकडून प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात ही सेवा अविरतपणे सुरू राहावी यासाठी आर्थिक नियोजनही करून ठेवण्यात आले. बससेवेसाठी जाधववाडी येथील १६ एकर जागेवर तब्बल १४ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक वर्कशॉप उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे.
स्मार्ट सिटी प्रशासनाने २०१७ मध्ये ३७ कोटी रुपये खर्च करून १०० बसेस खरेदी केल्या. मागील दोन वर्षांपासून शहरात मोजक्याच बसेस धावत आहेत. लवकरच या सेवेत पाच डबल डेकर बसही येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी ४० इलेक्ट्रिक बसेसही भाडेतत्त्वावर घेण्यात येतील. एवढ्या बसेस उभ्या करण्यासाठी, त्याची वेळोवेळी दुरुस्ती इ. कामांसाठी स्वतंत्र वर्कशॉपची गरज भेडसावत आहे. मुकुंदवाडी येथील एसटी महामंडळाचा बस डेपो नाममात्र दरात घेण्याचा प्रयत्न सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडून करण्यात आला. मात्र त्यात यश न आल्याने मनपाच्या जाधववाडी येथील जागेवर वर्कशाॅप उभारणीला संचालक मंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली. निविदा काढण्यात आली. आता प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाली आहे. वर्षभरात हे काम पूर्ण कसे होईल, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्मार्ट सिटी प्रशासनाने सांगितले.
चार हजार स्क्वेअर मीटर बांधकामवर्कशॉपसाठी चार हजार स्क्वेअर मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. साधारण ५०० मोठी वाहने या ठिकाणी उभी राहतील, अशी व्यवस्था राहणार आहे. संपूर्ण जागेवर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल. सध्या जमीन लेव्हल करण्याचे काम सुरू आहे.
बसेससाठी वर्कशॉपस्मार्ट सिटीतील सध्या असलेल्या बसेसची दुरुस्ती करण्यासाठी वर्कशॉप राहणार आहे. वॉशिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. ई-बसेससाठी चार्जिंग सुविधा राहणार आहे.
ट्रॅव्हल्स बसेसची सोयशहरातील खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस दिवसा गल्ली-बोळात, मुख्य रस्त्यांवर उभ्या राहतात. स्मार्ट सिटीच्या वर्कशॉपमध्ये ट्रॅव्हल्सच्या बसेसही पे ॲण्ड पार्क तत्त्वावर उभ्या राहतील.