औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इतिहास विभागाचे संशोधन केंद्र स्थापन करणार आहे. त्यात गावागावांत फिरून डाॅ. यू. म. पठाण यांनी संग्रहित केलेल्या ४ हजार पोथ्यांचे जतन करू. तसेच पुराणवास्तू संग्रहालयाचे अपूर्ण ७५ टक्के काम आणि इतिहासाचे संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी २३ कोटींचा प्रस्ताव केंद्राच्या सांस्कृतिक विभागाकडे पाठवणार असल्याची माहिती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.
डाॅ. यू. म. पठाण यांनी संकलित केलेल्या चार हजार पोथ्या मराठी विभागात धूळखात पडल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डाॅ. सुधीर रसाळ यांनी खंत व्यक्त केली होती. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, इतिहास विभागास यापूर्वी मिळालेला निधी अखर्चित असल्याने ब्लॅक लिस्टेड होता. ब्लॅक लिस्टेट यादीतून काढून नवा प्रकल्प केंद्राकडून मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिवांशी यासंबंधी चर्चा झाली आहे. इतिहास संशोधन केंद्र तसेच विविध अध्यासन केंद्रांसाठी एक स्वतंत्र अध्यासन भवन उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहे. निधीअभावी हे प्रकल्प हाती घेता आलेले नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून या प्रकल्पांमुळे संशोधन आणि संवर्धनालाही चालना मिळेल.
एनएडी, एबीसीचा विद्यार्थ्यांना होईल फायदाविद्यापीठाने २०१२ पासूनच्या २ लाख ३५ पदव्या नॅशनल अकॅडमिक डिपॉजिटरी (एनएडी) वर नोंद केल्या आहेत. अकॅडमिक बँक क्रेडिट (एबीसी) ही संकल्पनाही विद्यापीठाने राबवली असून त्यातही २००० हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामुळे शैक्षणिक वर्षात मिळवलेले गुणांचे क्रेडिट जमा होतील. मध्येच शिक्षण सोडून पुन्हा शिक्षण सुरू केल्यावर पदवीसाठी लागणारे क्रेडिट जमा झाल्यावर विद्यार्थ्यांना पदवी देता येणार आहे.