१) गुलमंडीवरील कुरिअर कंपनीच्या मॅनेजरच्या खुनाचे गूढ कायम
जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुलमंडीवरील नगरखाना गल्लीत कुरिअर कंपनीचे व्यवस्थापक कमलेश पटेल यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेला एक वर्ष होत आले तरी पोलिसांना मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आले नाही. पटेल यांचा खून कोणी केला आणि त्यांच्या हत्येचे कारण काय त्याचे गूढ कायम राहिले.
=============
२) वर्षभरात खुनाच्या २२ घटना
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वर्षभरात तब्बल २२ खून झाले. यापैकी २१ घटनेतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. केवळ गुलमंडीवरील पटेल याचे मारेकरी पोलिसांना शोधता आले नाही.
==========================
३) ११ महिन्यात फोडली १४९ घरे
शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये चोरट्यांनी ११ महिन्यात १४९ घरे फोडून चार कोटी ४५ लाख ७३ हजार ७४९ रुपयांचा ऐवज पळविला. घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेचे आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी तपास करून केवळ ४४ घरफोड्या उघड केल्या. याशिवाय वर्षभरात लहानमोठ्या तब्बल ९८८ चोऱ्या झाल्या.
====================
४) वाहन चोरांनी गाठला कळस
२०२०च्या सुरवातीपासून शहरात वाहन चोरट्यांचे सत्र सुरू आहेत. ११ महिन्यात शहरातील नागरिकांची ५८३ वाहने चोरट्यांनी पळविली. यापैकी ४० टक्के वाहने चोरट्यांकडून परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. गतवर्षीच्या तुलनेत वाहनचोरीची संख्या २३१ने घटली आहे. मात्र कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे जनता घरात बसून तर पोलीस रस्त्यावर होते. परिणामी वाहनचोऱ्या आणि घरफोड्या घटल्याचे दिसून येते.
==========================
५) लॉकडाऊनमुळे गतवर्षीच्या तुलनेत घटले गंभीर स्वरूपाचे गुन्हे
औरंगाबाद शहरातील गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत आहे. मागील अकरा महिन्यात शहरातील १७ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाच्या तीन हजार ५०३ गुन्ह्याची नोंद झाली. मात्र गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. गतवर्षी चार हजार ५४० गुन्हे दाखल झाले होते. लॉकडाऊनमुळे चार महिने शहर पूर्णपणे बंद होते. यामुळे गुन्हे घटल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केले.
=========================
६) महिला अत्याचाराचा आकडा गतवर्षी सारखा
महिलांवर बलात्काराच्या ७६ घटना पोलिसांत नोंदल्या गेल्या. गतवर्षी शहरातील विविध पोलीस ठाण्यात बलात्काराची ७८ गुन्हे दाखल झाले होते.
===================
पोलीस आयुक्त प्रसाद गेले, डॉ. गुप्ता आले
२०२०मध्ये शहर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर येथे बदली झाली. त्यांच्या रिक्तपदी डॉ. निखिल गुप्ता रुजू झाले. गुप्ता यांनी शहरात रुजू झाल्यापासून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला. शिवाय पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर त्यांनी उत्तम अशी पकड निर्माण केली.