औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ‘उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा’ (सीव्हीटीएस) विभागात तीन महिन्यांनंतर मंगळवारी बायपास शस्त्रक्रिया झाली. यंत्रसामुग्रीच्या अडचणींमुळे बायपास शस्त्रक्रिया ठप्प होती.
घाटीत गोरगरीब हृदयरोगी रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत, बायपास, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी यासारख्या उपचार प्रक्रिया, शस्त्रक्रिया व्हाव्यात, या उद्देशाने सीव्हीटीएस या स्वतंत्र विभागाची भव्य इमारत उभी राहिली. अत्याधुनिक प्रकारची उपकरणेही दाखल झाली. या विभागात गतवर्षी हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत मोरे नियुक्त झाल्यानंतर ‘बासपास’सह हृदयाच्या विविध शस्त्रक्रिया सुरू झाल्या. परंतु शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यांचा अभाव, यंत्राच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, यामुळे मागील तीन महिन्यांपासून बायपास शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अखेर साहित्याच्या उपलब्धतेनंतर आणि यंत्राच्या दुरुस्तीनंतर बायपास शस्त्रक्रिया सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला. गत आठवड्यात जिंतूरहून आलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीला बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. नातेवाईकांनी त्यांना घाटीत दाखल केले. मंगळवारी (दि.३०) सदर रुग्णावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास पाच तास ही शस्त्रक्रिया चालली. रुग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पाठपुरावा केलाहार्ट लंग मशीन नादुरुस्त होते. काही साहित्यही नव्हते. यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला. हे प्रश्न अखेर मार्गी लागले. तीन महिन्यांनंतर बायपास शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले.- डॉ. प्रशांत मोरे, हृदय शल्यचिकित्सक, घाटी